BJP suffers a big setback in Chimur, excitement in Bunty Bhangadia’s camp : भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाचे महामंत्री होते जुनेद खान, बंटी भांगडिया यांच्या गोटात खळबळ
Mumbai : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर विधानसभा मतदारसंघात आज भाजपला मोठा राजकीय धक्का बसला आहे. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री जुनेद खान, माजी नगराध्यक्ष संतोष गोहणे आणि भाजप नेते सतीश वनकर यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या तिघांसह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारीदेखील काँग्रेसमध्ये दाखल झाले. ज्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.
जुनेद खान हे चिमूर परिसरातील ओळखले जाणारे समाजसेवक आहेत. गेल्या काही वर्षांत त्यांनी भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चामार्फत पक्षाला गावागावांत नेण्याचे काम केले होते. मात्र, पक्षात अल्पसंख्याक नेत्यांकडे दुर्लक्ष, स्थानिक पातळीवरील गटबाजी आणि निर्णयप्रक्रियेतून वगळले जाणे या कारणांमुळे त्यांनी अखेर भाजपचा राजीनामा दिला. त्यांनी पक्ष सोडताना स्पष्ट शब्दांत सांगितले की , भाजपने अल्पसंख्याक समाजाचा केवळ राजकीय वापर केला. पण विकासाच्या आणि समान संधींच्या मुद्द्यावर आम्हाला दुर्लक्षित ठेवलं. काँग्रेस विचारांचा आणि सर्वसमावेशकतेचा पक्ष आहे, त्यामुळे आम्ही इथे आलो आहोत.
Local Body Elections : निवडणुकीच्या रणांगणात महायुती सज्ज, नागपुरात झाली महत्त्वाची बैठक
काँग्रेसमध्ये नवसंजीवनी..
जुनेद खान, संतोष गोहणे आणि सतीश वनकर यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे चिमूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला नवसंजीवनी मिळाल्याचं पक्ष कार्यकर्त्यांचं मत आहे. जिल्हा काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी या प्रवेशाचे स्वागत करत हा फक्त व्यक्तींचा नव्हे, तर विचारांचा विजय आहे, असे मत व्यक्त केले. या प्रवेश कार्यक्रमादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह प्रदेश पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
NCP Ajit Pawar : ताजबाग पुलाच्या सौंदर्यीकरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘अस्मिता एल्गार’
भाजपमध्ये वाढतोय असंतोषाचा सूर..
भाजप आमदार बंटी भांगडिया यांच्या गटातील हे तिन्ही नेते प्रभावशाली मानले जातात. त्यामुळे त्यांच्या काँग्रेसमध्ये गेल्याने पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषतः चिमूर आणि भद्रावती तालुक्यात पक्षाचे संघटनात्मक समीकरण बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. आगामी निवडणुकांत भाजपचा अहंकार मोडून काढण्यासाठी आम्ही एकदिलाने काम करू. जनतेचा विश्वास परत मिळवणे, हेच आमचं पहिलं उद्दिष्ट असेल, असे जुनेद खान काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर म्हणाले. या घडामोडीमुळे चिमूर मतदारसंघात राजकीय समीकरणांचा ताळमेळ पुन्हा बदलू शकतो. काँग्रेसला स्थानिक पातळीवर नवा जोम मिळाल्याचं स्पष्ट संकेत या प्रवेशाने दिले आहेत.








