Shivsena Dominance in Buldhana Council : विरोधकांकडून एकही अर्ज नाही; आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तीनही जागांवर वर्चस्व
Buldhana बुलढाणा नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीमध्ये शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) आपल्या राजकीय मुत्सद्देगिरीने विरोधकांना चितपट केले आहे. तीन जागांसाठी केवळ तीनच अर्ज दाखल झाल्याने प्रा. सुनील सपकाळ, उदय देशपांडे आणि मोहन पऱ्हाड यांची निवड आता निश्चित झाली आहे. शुक्रवारी, ९ जानेवारी रोजी या तिघांचे नामांकन अर्ज जिल्हा नगरविकास सहआयुक्त यांच्याकडे सादर करण्यात आले.
विरोधकांची माघार अन् शिवसेनेचा मार्ग मोकळा ३० सदस्यीय संख्याबळ असलेल्या बुलढाणा नगरपरिषदेत स्वीकृत सदस्यत्वासाठी मोठी चढाओढ अपेक्षित होती. मात्र, शिवसेनेने अत्यंत गोपनीय आणि वेगाने हालचाली करत आपल्या तीन उमेदवारांचे अर्ज दाखल केले.
अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत विरोधकांकडून एकही अर्ज सादर न झाल्याने ही निवड प्रक्रिया केवळ औपचारिकता उरली आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गटनेते मृत्युंजय गायकवाड यांनी या प्रक्रियेचे नियोजन करून नगरपरिषदेवर शिवसेनेची पकड किती मजबूत आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध केले.
अनुभवी चेहऱ्यांना संधी शिवसेनेने या निवडीत सामाजिक आणि राजकीय समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. प्रा. सुनील सपकाळ हे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्याचा अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. उदय देशपांडे यांच्याकडे पक्षातील अनुभवी आणि विश्वासू चेहरा म्हणून बघितले जाते. तर मोहन पऱ्हाड यांचा जनसंपर्क आणि त्यांची संघटनात्मक कामातील सक्रियता ध्यानात घेण्यात आली आहे.
BMC Election 2026: किशोरी पेडणेकरांची उमेदवारी धोक्यात? निलेश राणेंचा खळबळजनक दावा!
गायकवाड पिता-पुत्रांचे वर्चस्व नामांकन अर्ज सादर करताना शिवसेनेच्या नगरसेवकांची आणि कार्यकर्त्यांची मोठी फौज उपस्थित होती. गटनेते मृत्युंजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गजेंद्र दांदडे, सचिन गायकवाड, बबलू मावतवाल, योगेश परसे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शक्तीप्रदर्शन केले. या निवडीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच शिवसेनेने बुलढाणा शहरात ‘बॅकफूट’वर असलेल्या विरोधकांना मोठा धक्का दिला आहे.
नगरपरिषदेतील या विजयामुळे आता शिवसेनेच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून, लवकरच अधिकृत घोषणेनंतर नवनियुक्त सदस्यांचा सत्कार सोहळा पार पडणार आहे.








