Political movements : अजित पवारांना अखेरचा निरोप दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचालींना वेग

Discussions with CM Fadnavis on ministry decision of unity in hands of Sharad Pawar : खात्यांवरून मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा, तर एकीचा निर्णय शरद पवारांच्या हातात

Mumbai: बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरचा निरोप दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. शोकाकुल वातावरणात प्रथम सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

अजित पवार यांच्या अचानक निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अजित पवार एनडीएमध्ये राहणार की शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जुळवून घेणार, यावर चर्चा सुरू असतानाच ही दुर्घटना घडल्याने राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत. अजित पवार हे राष्ट्रवादीतील एकहाती आणि निर्णायक नेतृत्व होते. त्यांच्या तोडीचं नेतृत्व दुसऱ्या फळीत नसल्याने आता पक्षाचे भवितव्य, सत्ता वाटप आणि पुढील दिशा यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Plane crash investigation : बारामतीतील धक्कादायक विमान अपघाताची अखेर चौकशी सुरू!

या पार्श्वभूमीवर विद्या प्रतिष्ठानमधील अंत्यसंस्कारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत अजित पवार यांच्याकडे असलेली महत्त्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहावीत, याबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासह अर्थ, उत्पादन शुल्क आणि क्रीडा यासारखी अत्यंत महत्त्वाची खाती होती. त्यांच्या निधनानंतर ही खाती कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही खाती आपल्या वाट्याला यावीत, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे माध्यमांशी भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या जाण्यामुळे राष्ट्रवादीतील दोन गटांमधील एकीच्या चर्चांना नवे वळण मिळाले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का, यावर आता पवार कुटुंबीयांमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज किंवा उद्या पवार कुटुंबीय एकत्र बसून याबाबत अंतिम निर्णय घेतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, हा संपूर्ण निर्णय आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हातात गेला असून एकीबाबत अंतिम शब्द त्यांचाच असणार आहे. अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेत केवळ तेच मध्यवर्ती भूमिका बजावत होते. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे आणि शशिकांत शिंदे हे चर्चेत सहभागी होते.

Maharashtra Budget : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाआधी खर्चकपातीचा निर्णय

अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी, खात्यांचे वाटप आणि राष्ट्रवादीच्या भवितव्याबाबतचे निर्णय यामुळे राज्याच्या राजकारणात पुढील काही दिवसांत मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत आहेत.