Political Strategies : चिखली नगरपरिषदेत स्वीकृत सदस्यपदासाठी मोर्चेबांधणी; सत्ताधारी गटाकडून ४ तर विरोधकांकडून एकमेव अर्ज

Power play begins over co-opted member positions in Chikhli: भाजप-सेना युतीकडून उमेदवारांची भाऊगर्दी; काँग्रेस-राष्ट्रवादी गटातून प्राचार्य निलेश गावंडे यांची वर्णी निश्चित?

Chikhali चिखली नगरपरिषदेतील २८ सदस्य संख्येच्या आधारे कायद्यानुसार होणाऱ्या ३ स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. पक्षीय बलाबल आणि गटनिहाय रचनेनुसार नामनिर्देशन प्रक्रिया पार पडली असून, यामध्ये सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीने चार नावांचे प्रस्ताव सादर केले आहेत. तर दुसरीकडे, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधी गटाने केवळ एकाच उमेदवाराचे नाव निश्चित करून आपली रणनीती स्पष्ट केली आहे. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ही सर्व नावे सादर करण्यात आली असून, आता सर्वांच्या नजरा १३ जानेवारीच्या विशेष सभेकडे लागल्या आहेत.

२०२६ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर चिखली नगरपरिषदेचे सभागृह २९ सदस्यांचे (२८ नगरसेवक व १ नगराध्यक्ष) झाले आहे. भाजपचे १३ नगरसेवक आणि नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांच्यासह शिवसेनेच्या एका नगरसेविकेने सत्ताधारी गटाला पाठिंबा दिल्याने युतीचे संख्याबळ १५ वर पोहोचले आहे. अमोल खबुतरे यांच्या नेतृत्वाखालील या सत्ताधारी गटाने स्वीकृत सदस्यपदासाठी सुरेंद्र ठाकूर, सागर पुरोहित, महेश लोणकर आणि गोविंद देव्हडे या चार नावांची शिफारस केली आहे. नियमानुसार या गटाच्या वाट्याला २ जागा येणार असल्याने, या चारपैकी कोणत्या दोन नावांवर पक्षनेतृत्व शिक्कामोर्तब करणार, याबाबत सध्या प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Municipal elections : लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरेंचा घणाघात

दुसरीकडे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीत स्वतंत्र भूमिका घेतली असली, तरी निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सौ. मिनल निलेश गावंडे यांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे तयार झालेल्या विरोधी गटाच्या गटनेत्या म्हणून मिनल गावंडे यांची निवड करण्यात आली. या विरोधी गटाने आपल्या वाट्याला येणाऱ्या एका जागेसाठी प्राचार्य निलेश गावंडे यांचे एकमेव नाव जिल्हा प्रशासनाकडे पाठवले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी गटाकडून कोणताही पर्यायी अर्ज न आल्याने प्राचार्य निलेश गावंडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड होणे आता केवळ औपचारिकता मानली जात आहे.

Economic Boost : निवडणुकीतून पालिकेची तिजोरी भरली; बुलढाणा नगरपरिषदेला ५५ लाखांची करवसुली

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त होणारी ही सर्व नामनिर्देशने आता चिखली नगरपरिषदेचे पिठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी यांच्याकडे सोपवण्यात येणार आहेत. १३ जानेवारी रोजी होणाऱ्या विशेष सभेत भाजप-शिवसेना युतीचे २ आणि काँग्रेस-राष्ट्रवादी गटाचा १ अशा एकूण ३ सदस्यांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. सत्ताधारी गटातील चार नावांपैकी कोणत्या दोन समर्थकांना संधी मिळते आणि या निवडीनंतर पक्षात कोणती राजकीय समीकरणे बदलतात, याकडे चिखलीतील राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.