Dilip-Manorama Khedkar rendered unconscious tied to Pooja, what exactly happened : दिलीप-मनोरमा खेडकरांना बेशुद्ध करून पूजाला बांधले, नेमकं काय घडलं?
Pune: पुण्यातून एक धक्कादायक आणि गूढ प्रकार समोर आला असून, आयएएस पदावरून बडतर्फ करण्यात आलेल्या पूजा खेडकर यांच्या घरी नोकरानेच चोरी केल्याचा दावा करण्यात आला आहे. दिलीप आणि मनोरमा खेडकर यांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करण्यात आले, तर पूजा खेडकर यांना बांधून ठेवून घरातील मोबाईलसह काही वस्तू घेऊन नोकर पसार झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. या घटनेमुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली असून तपास सुरू करण्यात आला आहे.
पूजा खेडकर यांनी मंगळवारी रात्री फोनद्वारे चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून त्यांच्या बाणेर रस्त्यावरील बंगल्यात चोरी झाल्याची माहिती दिली. खेडकर कुटुंब या बंगल्यात वास्तव्यास असून घरात अनेक नोकरही राहतात. यापैकी एक नोकर अवघ्या आठ दिवसांपूर्वी नेपाळहून कामासाठी आला होता. हाच नोकर या चोरीमागे असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
Nitin Gadkari : गडकरींचा धडाका, तीन दिवसांत १६ बैठका, ९ जाहीर सभा
पूजा खेडकर यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित नोकराने रात्री दिलीप आणि मनोरमा खेडकर यांना गुंगीचे औषध दिले, त्यामुळे ते दोघेही बेशुद्ध झाले. त्यानंतर त्याने पूजाला बांधून ठेवले आणि घरातील सर्वांचे मोबाईल फोन घेऊन तो पसार झाला. काही वेळाने पूजा खेडकर यांनी दाराच्या कडीचा उपयोग करून स्वतःचे हात मोकळे केले आणि दुसऱ्या फोनवरून पोलिसांना घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच चतुःश्रृंगी पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. तपासादरम्यान दिलीप आणि मनोरमा खेडकर हे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी तत्काळ त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
पूजा खेडकर यांनी अद्याप या प्रकरणी लेखी तक्रार दाखल केलेली नाही. मानसिक स्थिती ठीक झाल्यानंतर तक्रार देऊ, असे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. मोबाईल फोनव्यतिरिक्त आणखी कोणकोणत्या वस्तू चोरीला गेल्या, याचीही सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे नेमकी किती चोरी झाली, याबाबत सध्या संभ्रम आहे.
Sudhir Mungantiwar : अल्पसंख्याक भागांच्या विकासासाठी मुनगंटीवारांनी दिली गती
दरम्यान, पूजा खेडकर या आधीच गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात अडकलेल्या आहेत. यूपीएससी परीक्षेत ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा गैरवापर करून जादा प्रयत्न मिळवले, तसेच कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने 23 डिसेंबर 2024 रोजी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना या प्रकरणात प्रथमदर्शनी मोठा कट असल्याचे निरीक्षण नोंदवले होते. यूपीएससीने त्यांची उमेदवारी रद्द करत भविष्यातील सर्व परीक्षांसाठी त्यांच्यावर बंदी घातली आहे, मात्र पूजा खेडकर यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
अशा पार्श्वभूमीवर आता त्यांच्या घरी घडलेल्या या कथित चोरीच्या प्रकाराने नव्या प्रश्नांची मालिका निर्माण झाली असून, हा प्रकार नेमका काय आहे, याचा सखोल तपास पुणे पोलीस करत आहेत.
__








