NCP ministers are not paying attention to Vidarbha : प्रफुल पटेलांनी विदर्भ विभागीय मेळाव्यात टोचले मंत्री-पदाधिकाऱ्यांचे कान
Nagpur राज्यात आपण सत्तेवर आहोत. विदर्भातून सहा आमदार निवडून आले आहेत. यानंतरही पक्ष वाढत नाही याला जबाबदार कोण? फक्त टाईट कपडे घालून फिरता. असे चालणार नाही. पक्ष वाढवावा लागेल, या शब्दांत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीचे मंत्री व पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.
नागपुरातील परवाना भवन येथे पक्षाचा विदर्भ विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला. नागपूर महानगरपालिकेसह पूर्व विदर्भातील सर्व स्थानिक निवडणुकांमध्ये जागावाटपावर राष्ट्रवादीचे लक्ष आहे. त्यादृष्टीने पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.
Local Body Elections : स्थानिक निवडणुकांसाठी भाजपचे ‘यंग कार्ड’!
विदर्भात अस्तित्व कायम राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष धडपडत आहे. अश्यात प्रफुल्ल पटेल यांनी मंत्र्यांचे विदर्भाकडे लक्ष नसल्याची खंत व्यक्त केली. ‘राज्यात राष्ट्रवादीचे १० मंत्री आहेत. यापैकी विदर्भात तीन पालकमंत्री व मंत्री आहेत. मात्र विदर्भात मंत्री दौरे करत नाहीत. पक्ष बांधणीवर त्यांचे लक्ष नाही. हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनात आणून दिले जाईल,’ या शब्दांत पटेल यांनी नाराजी व्यक्त केली.
‘कुणी किती क्रियाशिल सदस्यांची नोंदणी केली याची आकडेवारी आपल्याकडे आहे. तुम्हाला जिल्ह्यात दहा लोकं सापडत नसतील आणि पक्षाचे बेसिक कामही करत नसाल तर पक्ष कसा वाढणार,’ असा सवालही त्यांनी उपस्थितांना केला. महायुतीसोबत गेल्याने,
शरद पवारांना सोडल्याने अनेक जण टीका करीत होते. मात्र, आपला निर्णय योग्य होता. त्यामुळेच सरकारमध्ये आपण जनतेची कामे करू शकत आहोत, असेही पटेल म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थेत ज्या ठिकाणी एकत्र लढणे शक्य नसेल त्या ठिकाणी निकालानंतर एकत्र येण्यावर निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस नेते राहुल गांधी हे भारतीय सेनेचे मनोबल कमी करत आहेत. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नुकसान होणार नाही तर काँग्रेसचे नुकसान होणार आहे. त्यांच्या काँग्रेसचेच नेते आश्चर्य व्यक्त करीत आहेत, अशी टीका पटेल यांनी केली.