Will contest the 2029 LokSabha elections from Bhandara-Gondia : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीच पालकमंत्र्याची निवड करतील
Bhandara-Gondia : 2029 च्या लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया Bhandara-Gondia लोकसभा मतदारसंघातून आपण रिंगणात राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसपुढे मोठे आव्हान उभे होणार आहे, हेही स्पष्ट झाले आहे. रामनगर येथील निवासस्थानी गुरुवारी (दि.2) माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत प्रफुल्ल पटेल यांनी संवाद साधला.
प्रफुल्ल पटेल यांनी लोकसभा निवडणूक लढवल्यास काँग्रेसला तगडा उमेदवार द्यावा लागणार आहे. 2014 च्या निवडणुकीत या मतदारसंघातून नाना पटोले Nana Patole विजयी झाले होते. त्यावेळी ते भाजपमध्ये होते. मात्र त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले. मध्यावधी निवडणुकीत राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे विजयी झाले. 2019 मध्ये भाजपचे सुनील मेंढे येथून निवडून आले. मात्र, 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसने हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणला. सध्या काँग्रेसचे प्रशांत पडोळे भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे खासदार आहेत.
सरकार वचने पूर्ण करेल..
प्रफुल्ल पटेल यांनी राज्य सरकारच्या संदर्भातील प्रश्नांनाही उत्तरं दिली. ते म्हणाले, ‘राज्यातील महायुती सरकार शेतकरी, शेतमजूर, सर्व सामान्य जनतेचे सरकार आहे. आम्ही नेहमीच जनतेच्या पाठीशी राहिलो आहोत. महायुती सरकार जाहीरनाम्यातील सर्व वचने पूर्ण करेल.’ जिल्ह्याच्या व शहराच्या विकासाकरिता लोकप्रतिनिधींना जनतेने जाब विचारायला हवा, असेही ते म्हणाले.
CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांची नागपुरातीलही वॉर रूम सज्ज !
पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या चार दिवसांत..
महायुती सरकार सर्व आश्वासनांची पूर्तता करेल. नवनव्या योजनांची आखणी करून राज्याला प्रगतिपथावर नेणार आहे. आगामी दोन-चार दिवसांत पालकमंत्र्यांच्या जिल्हानिहाय नियुक्त्या होतील. पालकमंत्री कोण असेल, हे ठरवायला मी काही सरकारमध्ये नाही. मात्र, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीच पालकमंत्र्याची निवड करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. महायुती सरकार जनतेला दिलेल्या आश्वासनांची पाच वर्षांत पूर्तता करणार आहे. नव्या वर्षात नवे संकल्प करून हे सरकार राज्याला समृद्धीकडे नेईल, असा विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
धानाला हेक्टरी 25 हजार रुपये बोनस..
विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. या जाहीरनाम्यातील घोषणांची पूर्तता पाच वर्षांत महायुतीचे सरकार निश्चित पूर्ण करेल. धान उत्पादकांना हेक्टरी 25 हजार रुपये बोनस देण्याचे आश्वासनसुद्धा पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली. गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशिल असल्याचेही ते म्हणाले.