Signs of upheaval, Vijay Wadettiwar also has the same tone : उलथापालथ होण्याचे संकेत, विजय वडेट्टीवार यांचाही तोच सूर
Mumbai: महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत मिळाले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात काँग्रेससोबतची युती तुटल्यानंतर माध्यमांशी बोलताना थेट ‘राजकारणात मोठा भूकंप होणार’ असा दावा केला आहे. शरद पवार हे लवकरच धक्कातंत्र वापरणार असल्याचे संकेत देत त्यांनी सुप्रिया सुळे लवकरच केंद्रात मंत्री होतील, असे भाकीत केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळत आहे. तब्बल १२ हून अधिक ठिकाणी महायुतीचे समीकरण फिस्कटले असून अनेक शहरांमध्ये भाजप आणि शिवसेना एकमेकांविरोधात निवडणूक लढवणार आहेत. त्याचवेळी पुण्यात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युतीही तुटली आहे. जागावाटपावरून झालेल्या मतभेदांमुळे ही युती फिस्कटल्याचे स्पष्ट झाले असून, पुण्यातील ‘पाटीलकी’मुळे आमची आणि काँग्रेसची युती तुटल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
Bmc election : फडणवीस सरकारकडून घोर अन्याय; रिपब्लिकन स्वबळावर !
पुण्यात वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर निवडणूक लढवावी, असे स्पष्ट आदेश प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. मुंबईत काँग्रेससोबतच्या युतीमुळे कोणी नाराज असेल, तर त्याची आम्हाला पर्वा नाही. आमच्यासाठी पक्ष महत्त्वाचा आहे, नेते नाहीत, असेही आंबेडकर यांनी ठणकावून सांगितले. मात्र, याचवेळी त्यांनी सुप्रिया सुळे लवकरच केंद्रात मंत्री होतील, असा दावा करत राजकीय चर्चांना नवे वळण दिले आहे. या विधानानंतर शरद पवार हे पुन्हा धक्कातंत्र वापरणार का, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
Municipal election : जिल्हा सहसंपर्कप्रमुख किशोर जैन यांनी हाती बांधले घड्याळ
या घडामोडींना आणखी धार देणारे वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. उद्योगपती गौतम अदानी हे नुकतेच बारामतीला येऊन गेल्याचा दावा करत, त्यांच्या मध्यस्थीने शरद पवार हे लवकरच राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही लोकसभेत खासदारांची गरज असून शरद पवार यांच्याकडेही आमदारांची संख्या मर्यादित असल्याने दोन्ही बाजूंना हे समीकरण सोयीचे ठरू शकते, असा दावा त्यांनी केला आहे.
Municipal election : भाजपमध्ये उमेदवारीवरून स्फोट; कुणाला भोवळ, कुणाचा आक्रोश
पुण्यातील घडामोडींवर भाष्य करताना वडेट्टीवार यांनी सांगितले की, पुण्यात दोन्ही गट एकत्र येणे ही एकत्रीकरणाची पहिली पायरी ठरू शकते. मात्र, ही युती स्थानिक स्तरापुरती तात्पुरती आहे की भविष्यातील मोठ्या राजकीय हालचालींची नांदी आहे, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुकांच्या धुरळ्यात करण्यात आलेल्या या वक्तव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
__








