vba-cheif-prakash-ambedkar-attacks-pm-narendra-modi : अॅड. प्रकाश आंबेडकरांची टीका; २३ मार्चला संघ कार्यालयावर मोर्चा
Buldhana एप्सटीन फाइलप्रकरणावरून देशातील राजकारणात नवा वाद निर्माण झाला असून, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र टीका केली आहे. या प्रकरणात मोदी यांचेही नाव असल्याचा दावा करत ब्लॅकमेल होणारा पंतप्रधान देशासाठी घातक ठरू शकतो, असे वक्तव्य त्यांनी बुलढाणा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
या प्रकरणात कारवाईची मागणी करत २३ मार्च रोजी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा आंबेडकर यांनी केली. या आंदोलनात विरोधी पक्ष, डावे पक्ष तसेच विविध सामाजिक संघटनांना सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Devendra fadnavis : जगातील संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये असल्याचे अमेरिकेतील नेत्यांचेही मत
मुंबई येथे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडल्याची माहिती देताना आंबेडकर म्हणाले की, एप्सटीन फाइल हे केवळ सेक्स स्कँडल नसून त्यात अल्पवयीन मुलांवरील अत्याचारासारखे गंभीर आणि धक्कादायक आरोप आहेत. या प्रकरणात जगातील अनेक प्रभावशाली व्यक्तींची नावे चर्चेत आली असून केंद्र सरकारमधील काही नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही नाव असल्याचा दावा त्यांनी केला.
आंबेडकर यांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावरही टीका करत काही आंतरराष्ट्रीय करार भारताच्या सार्वभौमत्वासाठी धोकादायक ठरू शकतात, असा आरोप केला. “काही करारांमुळे भारताचे नुकसान होण्याची शक्यता असून परकीय शक्तींना देशात प्रभाव वाढवण्याची संधी मिळू शकते,” असे ते म्हणाले.
आरएसएसवर निशाणा साधत आंबेडकर म्हणाले की, राष्ट्रवाद आणि नैतिकतेचे धडे देणाऱ्या संघाने या प्रकरणावर भूमिका स्पष्ट करावी. पंतप्रधानांवर आरोप होत असताना संघाने याबाबत मौन का बाळगले, याचा जाब विचारण्यासाठीच नागपूर येथील संघ मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात मध्यमवर्गीय नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही आंबेडकर यांनी केले.








