Pune land scam : मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात एका पैशाचाही व्यवहार नाही

Ajit Pawar claims that Parth Pawar is innocent : पार्थ पवार निर्दोष असल्याचा अजित पवारांचा दावा

Pune : पुण्यातील मुंढवा येथील कथित जमीन व्यवहार प्रकरणावरून निर्माण झालेल्या राजकीय वादळानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पुत्र पार्थ पवारांची खुली पाठराखण केली आहे. “या प्रकरणात एका पैशाचाही व्यवहार झालेला नाही. फक्त नोंदणी करून खरेदीखत तयार करण्यात आलं, पण प्रत्यक्ष आर्थिक देवाणघेवाण झालीच नाही,” असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं.

अमेडिया या पार्थ पवारांच्या कंपनीने आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्यासाठी ही जमीन विकत घेतल्याची माहिती आहे. या व्यवहारात 21 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरणे अपेक्षित असताना फक्त 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याने विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला होता. प्रकरणाचा राजकीय पारा वाढल्याने अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं.

Criticism on NCP : राजकारण तापले, राष्ट्रवादीवरील तीव्र टीका भोवनार

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना पवार म्हणाले, “या प्रकल्पात एकही रुपया गुंतवलेला नाही. एक रुपयाही न देता इतकं सगळं कसं झालं, हे मलाच समजत नाही. मी प्रशासनाला स्पष्ट सांगितलं आहे की, माझ्या नातेवाईकांनी काही चूक केली किंवा दबाव टाकला, तर कोणत्याही दबावाला झुकू नका. मी अशा गैरव्यवहारांचं समर्थन कधीच केलं नाही.”

मुंढवा प्रकरणावर पुढे बोलताना पवार म्हणाले, “या व्यवहारात खरेदीखत व्हायलाच नको होतं, पण ते झालं. रजिस्ट्रारने नोंदणी कशी केली हेच कळत नाही. मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे की, याप्रकरणात सखोल चौकशी व्हावी. गेल्या 35 वर्षांत माझ्यावर अनेक आरोप झाले, पण एकही सिद्ध झालेला नाही. या प्रकरणातही सत्य बाहेर येईल.”

बोपोडी येथील अंडी उबवण केंद्राच्या जमिनीबाबत नवा वाद निर्माण झाल्यानंतर अजित पवारांनी त्यावरही भूमिका स्पष्ट केली. “या प्रकरणात आमच्या कुटुंबाचा काहीही संबंध नाही. पार्थ पवारांचा यात काडीइतकाही संबंध नाही. काही माध्यमांनी चुकीचं चित्र निर्माण केलं,” असा दावा त्यांनी केला.

पत्रकारांनी पार्थ पवार दोषी आहेत का असा प्रश्न विचारल्यावर पवार म्हणाले, “या प्रकरणात व्यवहार न तपासता नोंदणी करण्यात आली. आम्ही जेव्हा व्यवहार करतो, तेव्हा नामांकित वकिलांकडून कागदपत्रांची तपासणी करवून घेतो. पण या व्यवहारात तसं झालं नाही. मला हा व्यवहार झाल्याची माहिती नव्हती; अन्यथा मी स्वतः सांगितलं असतं करू नका.”

पार्थ पवारांना दिलेल्या सल्ल्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “पार्थ मुंबईत आहे, मी उद्या त्याला भेटणार आहे. या प्रकरणातून शिकायला हवं. पुढच्या वेळी कुणावरही अंधविश्वास ठेवू नका. तज्ज्ञ आणि वकिलांचा सल्ला घेऊनच पुढे जा. अनुभवातून माणूस शिकत असतो, हेही या प्रकरणाने दाखवलं.”

Maharashtra politics : सत्तेशिवाय राहू शकत नाही अशी औलाद !

मुंढवा जमीन व्यवहाराच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली असून, या प्रकरणातील सर्व शंका आणि आरोपांवरून अंतिम निर्णय चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या या प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेची लाट उसळली आहे.