Pune land scam : ‘काका मला वाचवा’ हाकेला बावनकुळेंनी दिला ओ

Ambadas Danve strongly attacks Revenue Minister : अंबादास दानवेंचा महसूल मंत्र्यांवर जोरदार हल्ला

Mumbai : पुण्यातील मुंढवा येथील वादग्रस्त जमीन प्रकरणावरून राज्यातील राजकारणात नव्या वादळाला सुरुवात झाली आहे. या प्रकरणात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी “व्यवहार रद्द करत आहोत, मग ४२ कोटी रुपयांची नोटीस का दिली?” असा सवाल उपस्थित करत आपल्या खात्यातीलच अधिकाऱ्यांवर अविश्वास दाखवला. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी बावनकुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत “काका मला वाचवा” या वाक्याचा वापर करत त्यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे.

पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने खरेदी केलेल्या सरकारी जमिनीवर गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर कंपनीने व्यवहार रद्द केला होता. तथापि, मुद्रांक शुल्क विभागाने या कंपनीला ४२ कोटी रुपयांची वसुली करण्याची नोटीस पाठवली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले होते की, “व्यवहार रद्द केला असताना ४२ कोटींची वसुली का करायची? हे तपासावे लागेल.” त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Peoples republican party : ‘पीपल्स रिपब्लिकन पार्टीची युती फक्त शिंदे गटासोबतच

अंबादास दानवेंनी समाज माध्यमावर पोस्ट करत म्हटले की, “तुमच्या विभागाचे अधिकारी दुप्पट दंड भरा म्हणतात, आणि महसूल मंत्री म्हणतात की ‘तपासावे लागेल!’ अधिकारी बळी द्यायचा होता तेव्हा तासाभरात निलंबनाची पत्रं तयार झाली होती. आता पार्थ पवारांच्या निर्णयावर कारवाईची वेळ आली की तपास सुरू झाला. ‘काका मला वाचवा’ या हाकेला बावनकुळेंनी ओ दिली आहे. अजितदादांचा राजीनामा घेणं तर दूरच, पण आता त्यांच्या सुपुत्राच्या खिशाला चटका बसू नये, याची जबाबदारी मेवाभाऊंनी बावनकुळेंना दिली आहे,” अशी जोरदार टीका त्यांनी केली.

Vanchit Bahujan Aghadi : “आता आमदार-खासदारांना तेल लावा, स्वराज्यात सत्ता वंचितांची आणा!”

या वादग्रस्त जमिनीच्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमली असून, या समितीला एका महिन्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, “या व्यवहारात प्रथमदर्शनी दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, ४२ कोटींची नोटीस का आणि कोणत्या आधारावर देण्यात आली, हे तपासानंतर स्पष्ट होईल.”

या सर्व घडामोडींमुळे आता मुंढवा प्रकरण केवळ जमीनपुरतं न राहता राजकीय रंग घेत आहे. भाजप आणि ठाकरे गटामधील आरोप-प्रत्यारोपामुळे आगामी हिवाळी अधिवेशनात हे प्रकरण पुन्हा गाजणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

______