Anjali Damania directly accuses Ajit Pawar while reading entries in police diary : पोलीस डायरीतील नोंदी वाचत अंजली दमानियांचे अजित पवारांवर थेट आरोप
Mumbai : पुण्यातील विवादित जमीन व्यवहार प्रकरणात नवीन घडामोडी घडत असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पार्थ पवार आणि अजित पवार यांच्यावर गंभीर आरोपांची मालिका सुरू ठेवली आहे. दमानिया म्हणाल्या की, पार्थ पवारांना कोणत्याही प्रकारची क्लिन चिट मिळालेली नाही आणि मुख्य आरोपी सूर्यकांत येवलेला अटक झाली तर संपूर्ण प्रकरण उघडकीस येईल.
पोलीस डायरीतील नोंदींचा आधार घेत दमानिया यांनी सांगितले की, अमेडिया इंटरप्रायजेसच्या माध्यमातून जमीन बळकावण्याचा प्रयत्न झाला असून या कारवाईत राजकीय प्रभाव, दबाव आणि बळाचा वापर दिसून येतो.
अंजली दमानिया यांनी १६ जून २०२५ रोजी दुपारी ४:२८ वाजता केलेल्या पोलीस नोंदींचा उल्लेख करत सांगितले की मुंढवा पोलीस ठाण्याला बॉटेनिकल गार्डनकडून तक्रार मिळाली होती. ॲड. तृप्ती ठाकूर यांनी फोन करून सिक्युरिटी कर्मचाऱ्यांना प्रवेश नाकारल्याचे सांगत पोलिसांची मदत मागितली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर बॉटेनिकल गार्डनचे प्रमुख बाळासाहेब कदम, महेश पुजारी आणि सुरक्षा रक्षकांनी अमेडिया कंपनीच्या लोकांनी जागेवर अधिकार सांगत दादागिरी केल्याची माहिती दिली. कोणतीही कागदपत्रे नसतानाही जागा रिकामी करण्याचा दबाव आणला गेला होता आणि बाऊन्सर घेऊन स्थलांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, असा आरोप दमानिया यांनी केला.
Local body election : नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर महायुतीत तणाव, शिंदे गटात धुसफूस
दमानिया यांनी आरोप केला की हे सर्व व्यवहार पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीकडून होत होते आणि हे साधे व्यवहार नसून केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जमीन बळकावण्याचा प्रयत्न होता. त्यांनी म्हटले की पोलिसांवरही दबाव आणला गेला आणि राजकीय पाठबळाचा प्रभाव स्पष्ट दिसत आहे. त्याचबरोबर त्यांनी मोठी मागणी करत सांगितले की या संपूर्ण घटनेदरम्यान पार्थ अजित पवार यांचे टॉवर लोकेशन आणि सीडीआर तपासले गेले पाहिजेत. अडीच किलोमीटरच्या परिसरात ते कुठे होते हे स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
Local body election : नगराध्यक्षपद बिनविरोध, राजकारणात तापल !
सूर्यकांत येवलेला अटक केली तर तो संपूर्ण सत्य बाहेर काढेल, अमेडिया इंटरप्रायजेसचे नाव घेईल आणि संपूर्ण व्यवहार कसा झाला हे उघड होईल असा दावा त्यांनी केला. येवलेचा जामीन मंजूर होणे हीही संशयास्पद बाब असल्याचे त्यांनी म्हटले. दमानिया यांनी पोलिसांना आव्हान देत म्हटले की उद्याच येवलेला अटक करून त्याचे जबाब नोंदवावेत आणि तसे झाले तर सगळा घोळ समोर येईल.
या सर्व घडामोडींनंतर अंजली दमानिया यांनी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री या दोन्ही पदांचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. जमीन व्यवहारातील अनियमितता, राजकीय दबाव आणि पोलिसी हस्तक्षेप या संपूर्ण प्रकरणामुळे सरकारवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे त्या म्हणाल्या.
______








