Pune Municipal Corporation Mayor Election : अनुभवी नगरसेविका मंजुषा नागपुरे पुण्याच्या महापौर

Manjusha-nagpure-appointed-as-pune-mayor-unopposed : महापालिकेत विरोधकांची माघार; रामदास आठवलेंच्या आरपीआयला उपमहापौरपद

Pune पुणे महानगरपालिकेच्या महापौर निवडीचा पेच अखेर सुटला असून, भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका मंजुषा नागपुरे यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. महापालिका निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर महापौर कोण होणार, याबाबत उत्सुकता होती. अखेर भाजपच्या कोअर कमिटीने मंजुषा नागपुरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यांच्या विरोधात कोणत्याही विरोधी पक्षाने उमेदवार उभा न केल्यामुळे ही निवड बिनविरोध पार पडली असून, पुण्याच्या राजकारणात भाजपची रणनीती यशस्वी ठरली आहे.

मंजुषा नागपुरे या पुणे महापालिकेत सलग तीन वेळा निवडून आलेल्या अनुभवी नगरसेविका आहेत. स्थानिक प्रशासकीय कामकाजाची सखोल जाण आणि सामाजिक कामातील सक्रिय सहभाग यामुळे त्यांच्या नावाला पक्षांतर्गत आणि बाहेरूनही मोठा पाठिंबा मिळाला. पुरेसे संख्याबळ नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने महापौरपदासाठी अर्ज दाखल न करण्याची भूमिका घेतली, ज्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेत आवाजी मतदानाद्वारे त्यांच्या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

Ajit Pawar Plane crash : विमान अपघात, नेत्यांचा हवाई प्रवास आणि सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न !

महायुतीच्या ठरलेल्या सूत्रानुसार, उपमहापौरपद आरपीआयला (RPI) देण्यात आले असून, या पदावर परशुराम वाडेकर यांची वर्णी लागली आहे. भाजपने निवडणुकीत ११९ पेक्षा अधिक जागा जिंकून निर्भेळ बहुमत मिळवल्याने सत्ता स्थापनेचा मार्ग आधीच मोकळा झाला होता. आता अनुभवी चेहऱ्यांकडे शहराची धुरा सोपवून भाजपने आपली पकड अधिक मजबूत केली आहे. मंजुषा नागपुरे यांच्या निवडीमुळे पुणेकरांना एक कार्यक्षम आणि अनुभवी महापौर मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.