Dance bar video of BJP woman candidate’s husband goes viral : रवींद्र धंगेकरांचा भाजपवर घणाघाती हल्ला; “चारित्र्यहीन लोकांसाठी कोटा आरक्षित आहे का?” म्हणत विचारला जाब
Pune पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असताना पुण्याच्या राजकारणात एका खळबळजनक व्हिडिओने भूकंप घडवून आणला आहे. शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या एका महिला उमेदवाराच्या पतीचा डान्सबारमध्ये डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर (X) शेअर केला आहे. या ‘व्हिडिओ बॉम्ब’मुळे भाजपच्या गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून, निवडणुकीच्या तोंडावर ‘नैतिकता’ आणि ‘चारित्र्या’चा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
रवींद्र धंगेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये भाजपच्या संस्कृतीवर आणि उमेदवारी वाटपाच्या पद्धतीवर सडकून टीका केली आहे. “भारतीय जनता पक्षाने उमेदवारी वाटताना चारित्र्यहीन लोकांसाठी वेगळे आरक्षण ठेवले आहे की काय, असे वाटू लागले आहे. जो प्रचार प्रमुख महापालिकेच्या टेंडरचा पैसा डान्सबारमध्ये उडवत असेल, त्या पक्षाकडून जनतेने काय अपेक्षा ठेवाव्या?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. हा व्हिडिओ प्रभाग क्रमांक १२ मधील भाजप उमेदवाराच्या पतीचा असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
Akola Municipal Corporation : २० वर्षांत फक्त ५ महिला महापौर!
धंगेकर यांनी केवळ व्हिडिओवरच न थांबता, गंभीर आर्थिक आरोपही केले आहेत. “व्हिडिओमधील हा व्यक्ती शिवाजीनगर मतदारसंघाच्या आमदारांचे सर्व आर्थिक विषय सांभाळतो. या भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैशातून बारबाळांसाठी विशेष कोटा आरक्षित ठेवलेला दिसतोय,” अशी जहरी टीका त्यांनी केली. या आरोपांमुळे शिवाजीनगरमधील भाजप आमदार आणि संबंधित उमेदवाराच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधताना धंगेकर म्हणाले की, “नेहमी संस्कृतीच्या गप्पा मारणारे हे नेते आता या चारित्र्यहीन कृत्याचा खुलासा करतील का? हाच का तुमचा ‘पार्टी विथ डिफरन्स’?” या टिकेमुळे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची कोंडी झाली आहे.
Devendra Fadnavis : शब्द न पाळल्यामुळे देवेंद्र फडणवीस अजित पवारांवर नाराज!
या व्हिडिओमुळे निवडणुकीच्या पूर्वसंध्येला पुण्यात भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष टोकाला पोहोचला आहे. भाजपने अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली, तरी मतदानाच्या दिवशी या व्हिडिओचा मतदारांच्या मनावर काय परिणाम होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. प्रभाग १२ सह संपूर्ण शिवाजीनगर परिसरात या व्हिडिओचीच चर्चा सध्या रंगली आहे.








