Rahul Narvekar : व्हिडिओ क्लिपमध्ये दबावाचे पुरावे नाहीत, राहुल नार्वेकर यांना ‘क्लीनचिट’?

Assembly Speaker gets clean chit in candidate threat case : उमेदवारांना धमकावल्या प्रकरणी निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण, ‘इक्बालसिंह चहल’ यांच्या अहवालाकडे लक्ष

Mumbai कोलाबा विधानसभा मतदारसंघातील मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप नेते आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांनी राजकीय वातावरण तापले आहे. प्रभाग २२५, २२६ आणि २२७ मधील उमेदवारांना धमकावल्याच्या आणि निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याच्या तक्रारींनंतर आता राज्य निवडणूक आयोगाने यावर महत्त्वाची भूमिका मांडली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी प्राथमिक माहिती देताना सांगितले की, आयोगाकडे प्राप्त झालेल्या व्हिडिओंमध्ये राहुल नार्वेकर यांच्याकडून थेट दबाव आणल्याचे स्पष्ट पुरावे तूर्तास तरी दिसत नाहीत.

कोलाबा येथील प्रभाग २२५ ते २२७ हे पालिकेच्या ‘ए’ (A Ward) प्रभागांतर्गत येतात. या प्रभागांमध्ये राहुल नार्वेकर यांचे जवळचे नातेवाईक (मकरंद नार्वेकर आणि हर्षिता नार्वेकर) निवडणूक लढवत असल्याने, नार्वेकर यांनी प्रशासनावर दबाव आणून विरोधकांचे उमेदवारी अर्ज बाद केल्याचा आरोप आम आदमी पक्ष (AAP) आणि काही अपक्ष उमेदवारांनी केला होता. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नार्वेकर यांची उपस्थिती आणि त्यानंतर काही उमेदवारांचे अर्ज तांत्रिक कारणास्तव नाकारले जाणे, यामुळे या संशयाला बळ मिळाले होते.

BMC Election: निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे बांधुनी भाजपला कोंडीत पकडले !

निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले की, आयोगाला सादर करण्यात आलेल्या व्हिडिओ क्लिप्सची तपासणी केली असता, त्यात नार्वेकरांकडून धमकावल्याचा कोणताही थेट प्रकार निदर्शनास आलेला नाही. मात्र, हे प्रकरण पूर्णपणे बंद झालेले नाही. आयोगाने संबंधित सर्व पुरावे आणि तक्रारी मुख्य निवडणूक निरीक्षक इक्बालसिंह चहल यांच्याकडे पुढील चौकशीसाठी पाठवल्या आहेत. चहल यांचा अंतिम अहवाल आल्यानंतरच या प्रकरणात राहुल नार्वेकर यांना पूर्णपणे ‘क्लीनचिट’ द्यायची की नाही, याचा निर्णय घेतला जाणार आहे.

Sudhir Mungantiwar : श्रीरामांना काल्पनिक म्हणणाऱ्या काँग्रेसच्या विचारांवरच रावणछाया

दरम्यान, प्रभाग २२६ मधील अपक्ष उमेदवार तेजल पवार यांनीही नार्वेकरांवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात काही सीसीटीव्ही (CCTV) फुटेज गायब झाल्याच्या तक्रारींमुळे प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांनी नियमांनुसारच अर्ज नाकारल्याचे आयोगाचे म्हणणे असले, तरी दबावाखाली येऊन ही प्रक्रिया राबवली गेली का, याचा तपास अद्याप सुरू आहे. या प्रकरणाच्या निर्णयामुळे कोलाबा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, १५ जानेवारीच्या मतदानापूर्वी चहल यांचा अहवाल काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.