Raj and Uddhav Thackeray : अस्तित्व टिकवायसाठी एकत्र यावंच लागेल, शत्रुचा शत्रू मित्र !

 

Raj and Uddhav Thackeray must come together to survive : ..तर मनसेचे राजकारण मार्गी लागू शकेल, मातोश्रीलाही मार्ग मिळेल

 

Nagpur : उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र येण्याचे संकेत कालपासून मिळत आहेत. राज ठाकरे यांनी साद घातली अन् उद्धव ठाकरेंनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर दोन्ही ठाकरे एकत्र येतील, असे मानले जात आहे. त्यावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या एकत्र येण्यामागे महाराष्ट्रहित, मराठी अस्मिता वगैरे.. वगैरे.. सांगितले जात आहे. पण दोन्ही ठाकरेंनी एक होणे ही त्यांची राजकीय गरज बनली आहे. दोघांनाही महाराष्ट्रात अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल, तर एकत्र यावंच लागेल, अशी परिस्थिती आहे.

एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंचे ४० आमदार घेऊन गेले, ही बाब मातोश्रीच्या चांगलीच जिव्हारी लागली. तेव्हापासून उद्धव ठाकरेंच्या पक्षाची शकले झाली. आतापर्यंत उद्धव ठाकरेंनी सगळीकडे हातपाय मारून पाहिले, पण भट्टी काही जमली नाही. तेव्हापासूनच मनसेसोबत युती करण्याचे विचार त्यांच्या मनात रुंजी घालू लागले असावे. अशात राज ठाकरेंनी साद घातली. निश्चित उद्धव ठाकरेंना याचा आनंद झाला आणि त्यांनी लगेच होकारात्मक प्रतिसाद दिला. अस्तित्व टिकवायचे असेल तर एकत्र यावं लागेल, याची उपरती दोन्ही भावांना झाली.

Pravin Darekar : राजकीय गरज म्हणून एकत्र येण्याचा प्रयत्न !

सद्यस्थिती पाहता राज ठाकरे यांच्या पक्षाची स्थिती फार काही चांगली नाही. केवळ सभांना गर्दा खेचणारे नेते म्हणूनच त्यांची ओळख आहे. त्यांचे संसदीय राजकारण गटांगळ्या खात आहे. थोडक्यात काय तर त्यांच्या राजकारणाचे पानीपत झालंय. एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात आलं आणि त्यांनी साद घातली. त्याला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला ही चांगली गोष्ट झाली. गेल्या कित्येक वर्षापासून तमाम शिवसैनिकांची इच्छा या एकीने पूर्ण होईल आणि मनसेचे राजकारण मार्गी लागू शकेल. मातोश्री ज्या अडचणींतून जात आहे, त्यांनाही मार्ग मिळेल. शेवटी ‘एकीचे बळ’ हे मोठेच असते.

Harshawardhan Sapkal : राज – उद्धव ठाकरे एकत्र येत असतील, तर स्वागतच !

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ..
उद्धव आणि राज ठाकरे लढत राहिले आणि तिसरा त्यांचा पक्ष घेऊन गेला, हे आताशा दोन्ही ठाकरेंना कळून चुकल आहे. किरकोळ भांडणे बाजुला ठेऊन एक झाले तर चांगलंच आहे. भलेही एक पक्ष न राहील. पण युती म्हणून दोघे एकत्र येताना पाहायला मिळतील. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या घडामोडी होत आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचे भवितव्यही उज्वल होईल, असे म्हणायला काही हरकत नसावी.

Raj – Uddhav Thackeray : राज – उद्धव एकत्र येणार ? महाराष्ट्राचे राजकारण बदलणार ?

शत्रुचा शत्रू मित्र..
उद्धव ठाकरे यांचा राजकीय शत्रू स्पष्ट आहे. पण राज ठाकरेंनी महायुतीला पाठींबा दिला होता. भाजपच्या बाबतीत ते सकारात्मक आहेत. पण राजकारणात मित्र निवडणे जेवढे गरजेचे आहे, तेवढेच शत्रू निवडणेही महत्वाचे आहे. शिंदेंची शिवसेना आपली शत्रू आहे, हे एव्हाना राज ठाकरेंना उमगले असावे. त्यानंतर उद्धव – राज एकत्रीकरणाच्या हालचाली सुरू झाल्या. याची माहिती एकनाथ शिंदेंच्या गोटात मिळाली. त्यानंतर उदय सामंत आणि एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. बंदद्वार राज ठाकरेंची मनधरणी करण्याचे त्यांनी प्रयत्न केल्याचेही पाहायला मिळाले. आता दोघे भाऊ शिंदेंना विरोध करत राजकारण करण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

  • अतुल मेहेरे (विशेष प्रतिनिधी)

    अमरावती विद्यापीठातून पत्रकारीतेची पदवी. २६ वर्षांपासून पत्रकारीतेमध्ये कार्यरत. सन २००० पासून लोकमत आणि सकाळ वृत्तपत्र समुहामध्ये विविध पदांवर कार्य केलेले आहे. दैनिक सकाळच्या सरकारनामा या वेब पोर्टलसाठी राजकीय प्रतिनिधी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.