Harshawardhan Sapkal said that if Raj – Uddhav Thackeray are coming together, then welcome! : आम्ही कुटुंब फोडणारे नाही, तर भारत जोडोवाले
Pune : कालपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचे वारे वाहू लागले. यासंदर्भात सर्वच राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही यावर प्रतिक्रिय दिली आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असतील, तर त्याचे स्वागतच आहे, असे ते म्हणाले.
पुण्यात काल (१९ एप्रिल) पत्रकारांशी बोलताना सपकाळ म्हणाले, आम्ही भारत जोडोवाले आहोत, कुटुंब फोडणार नाही. त्यामुळे दोन ठाकरे एकत्र येणार असतील, दोन कुटुंब जोडले जाणार असतील, तर आम्ही त्याचे स्वागत करू. कारण भाजप – महायुती महाराष्ट्राचे नुकसान करत आहे. ते महाराष्ट्रद्रोही आहेत. महाराष्ट्र धर्माचे नुकसान होत आहे. शिव – शाहू – फुले – आंबेडकरांच्या या राज्यात भाजप भाषा आणि संस्कृती तोडण्याचे काम करत आहे. राज ठाकरे यांनी जे विचार मांडले, त्यातून याला दुजोरा मिळतो. महाराष्ट्राच्या मुळावर उठलेल्यांना तोंड देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.
पुण्यात काल मायनॉरीटी युथ पार्लमेंट कार्यक्रम पार पडला. त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आज संविधान, अल्पसंख्यांना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्तेतील लोक भिती दाखवत आहोत, घाबरवत आहेत. अल्पसंख्याक समाजांत भिती आहे, शेतकऱ्यांमध्ये भिती आहे, बेरोजगार तरुणही भयभीत झालेले आहेत. , महिला दहशतीखाली जगत आहेत. कारण घराबाहेर पडले तर सुरक्षित राहू शकेन की नाही याची तिला भिती वाटत आहे. गृहिणी भितीत जगत आहेत कारण महागाईने जगणे कठीण करून ठेवले आहे. बहुजन सुद्धा भितीत जगत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही त्यामुळे शिवभक्तांमध्येही भिती आहे. अशा दहशतीखाली किती दिवस जगायचे, असा सवाल करत या परिस्थितीचा सामना करायचा असेल तर एकता व अखंडतेची मशाल घेऊनच आपल्याला पुढे जावे लागणार आहे. असे सपकाळ म्हणाले.








