BJP criticised over EVMs and airport privatisation : ईव्हीएम आणि विमानतळ विक्रीवरून प्रहार; राज ठाकरे यांची भाजपवर टीका
Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वर्षांनंतर एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका संयुक्त मुलाखतीत केंद्र सरकार आणि भाजपच्या धोरणांवर कडाडून टीका केली. “मुंबईचे महत्त्व कमी करून इथली संपत्ती गुजरातला पळवण्याचा पद्धतशीर कट रचला जात आहे,” असा खळबळजनक आरोप करत दोन्ही ठाकरे बंधूंनी आगामी राजकीय संघर्षाचे संकेत दिले आहेत.
राज ठाकरे यांनी भाजपच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना मतपत्रिकेचा आग्रह धरला. तेलंगणा आणि पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा संदर्भ देत राज ठाकरे म्हणाले की, “जिथे मतपत्रिकेद्वारे मतदान झाले, तिथे भाजप सातव्या क्रमांकावर फेकला गेला. ईव्हीएमची जादू नसेल, तर भाजपचा पत्त्यांचा बंगला कोसळायला वेळ लागणार नाही.” देशातील महत्त्वाचे प्रकल्प आणि विमानतळ खासगी समूहांच्या घशात घातले जात असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.
Ganesh Naik : ‘माझा पोरगा चोर आहे, असं बापाने बोलू नये’; गणेश नाईकांचा विरोधकांना जळजळीत टोला
मुलाखतीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील मराठी माणसाच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली. “मुंबई महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही, पण इथल्या मराठी माणसाचा आवाज दाबला जात आहे. हिंदीचे वाढते वर्चस्व आणि मराठी माणसाला दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही,” असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. सध्याचे मुख्यमंत्री केवळ दिल्लीचे आदेश पाळण्याचे काम करत असून राज्याच्या हिताचे प्रकल्प बाहेर पळवले जात असल्याचा आरोपही दोन्ही नेत्यांनी एकसुरात केला.
राज आणि उद्धव ठाकरे दीर्घकाळानंतर एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने भाजपविरोधी आघाडीला नवे बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. “हेच कृत्य जर काँग्रेसने केले असते, तर भाजपने देशभर तांडव केले असते,” असे म्हणत राज ठाकरे यांनी भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवले.
BMC election: मोदी मोठे होण्याआधी अंबानी मोठे होते, मोदी मोठे झाल्यानंतरच अदानी मोठे झाले
या संयुक्त मुलाखतीमुळे महाराष्ट्रात ‘मराठी अस्मिता विरुद्ध भाजप’ असा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे असून, ठाकरे बंधूंची ही जवळीक महायुतीसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.








