Giving word for Marathi people in changing politics, with firm belief in heritage : बदलत्या राजकारणात मराठी माणसासाठी शब्द देत वारशावर ठाम विश्वास
Mumbai: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक अत्यंत भावनिक आणि अर्थपूर्ण पोस्ट शेअर केली आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य करत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा वैचारिक वारसा आणि मराठी माणसाची अस्मिता याबाबत ठाम भूमिका मांडली असून मराठी माणसाला एक मोठा शब्द दिला आहे. त्यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात तसेच सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
आज दादर येथील शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिवसैनिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक जुना कृष्णधवल फोटो शेअर केला असून या फोटोत ते बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत व्यासपीठावर उभे असल्याचे दिसत आहे. या छायाचित्रासोबत दिलेल्या दीर्घ पोस्टमध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व, प्रभाव आणि मराठी माणसासाठी असलेले त्यांचे अतूट प्रेम अधोरेखित केले आहे.
Narendra Modi : महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बाळासाहेबांच्या विचारांतून प्रेरणा मिळते
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, इतिहासात अनेकांची जन्मशताब्दी साजरी झाली आहे आणि होईलही, मात्र एखादी व्यक्ती हयात नसतानाही लोकांच्या स्मरणात जिवंत राहणे आणि आजही एखाद्या प्रांताच्या राजकारणाला व समाजकारणाला दिशा देणे हे अत्यंत दुर्मिळ आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतीतच हे घडले असून ते केवळ १०० वर्षांनंतरच नव्हे तर त्यांच्या द्विशतकी जन्मवर्षातही लोकांच्या स्मरणात राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र त्या काळातील मराठी माणूस दुभंगलेला, खचलेला किंवा अन्याय सहन करणारा नसावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
सध्याच्या राजकारणावर भाष्य करताना राज ठाकरे यांनी निष्ठा विकल्या जात असल्याचे, तत्त्व सहज फेकून दिली जात असल्याचे नमूद केले आहे. आज राजकारणात यश हे मूल्यांवर नव्हे तर निवडणुकीतील गणितांवर मोजले जाते, अशी टीकाही त्यांनी केली आहे. बाळासाहेबांच्या काळात सत्तेचे अप्रूप नव्हते, मात्र सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या स्थानावर पाहण्याचे समाधान त्यांना होते, असे सांगत त्यांनी बाळासाहेबांच्या नेतृत्वशैलीचे वेगळेपण अधोरेखित केले आहे.
बाळासाहेब ठाकरे हे दूरदर्शी होते आणि त्यांचा दृष्टिकोन आजही तितकाच सुसंगत आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. बाळासाहेबांसारखी प्रतिभा पुन्हा होणार नाही, तसेच त्यांच्या पद्धतीचे राजकारणही भविष्यात कोणालाच करता येणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी मराठी भाषा, मराठी प्रांत आणि मराठी माणसासाठी उभारलेला लढा कायम धगधगत राहील, याची जबाबदारी पुढील पिढ्यांवर असल्याचे नमूद केले आहे. हा लढा आम्ही प्रामाणिकपणे पुढे नेऊ, हा मराठी माणसाला दिलेला शब्द आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
राजकारणात कधी कधी लवचिक भूमिका घ्यावी लागली तरी ती कधीही व्यक्तिगत स्वार्थासाठी नसेल, असा शब्द देत राज ठाकरे यांनी बाळासाहेबांकडून मिळालेल्या संस्कारांची आठवण करून दिली आहे. बाळासाहेब ठाकरे आणि मराठी या दोन शब्दांवरील आपली आणि महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा कधीही कमी होणार नाही, असे सांगत त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेक स्तरांतून त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. बदलत्या राजकारणात बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्त्वांची आठवण करून देत मराठी अस्मितेचा लढा सुरूच राहील, असा ठाम संदेश या पोस्टमधून देण्यात आला आहे.








