Retreat over controversial statement on death : निधनावरील वादग्रस्त वक्तव्यावर सारवासारव
Mumbai : शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं वादळ उठलं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना कदम यांनी केलेल्या विधानामुळे शिंदे गट अडचणीत सापडला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव मातोश्रीमध्ये दोन दिवस ठेवलं गेलं आणि त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले, असा गंभीर आरोप कदम यांनी केला होता. या विधानानंतर उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळले.
या प्रकरणात शिंदे गटातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी मौन बाळगणं पसंत केलं. “हे वक्तव्य आमचं नाही” अशी भूमिका घेत त्यांनी हात वर केल्याचे चित्र दिसले. त्यामुळे या प्रकरणाचा राजकीय फटका शिंदे गटाला बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वादंग उभा राहिल्याने शिंदेसेनेचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भाजपलाही याची झळ बसू शकते, अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे.
Arvind Sawant : थापाड्या सरकारला शेतकऱ्यांचा कंटाळा, अरविंद सावंतांची टीका
वाद वाढताच रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन स्वतःचं स्पष्टीकरण दिलं. बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहेत. मी कोणाच्याही भावना दुखावण्यासाठी बोललो नाही, असं ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितलं, दिवाळी होती, लोकांच्या घरातील कंदील विझता कामा नयेत. लोकांची दिवाळी चांगली साजरी व्हावी म्हणून उद्धव ठाकरेंनी सांगावं की आम्ही दोन दिवस पार्थिव ठेवलं. माझं एवढंच म्हणणं आहे.
तथापि, कदम यांच्या या वक्तव्याने त्यांनी केलेल्या आरोपांवर पडदा पडला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण त्यांनी पत्रकार परिषदेत पुन्हा म्हटलं, बाळासाहेब ठाकरे यांचं पार्थिव दोन दिवस खोलीत का ठेवलं, हा संशय मी व्यक्त केला. त्यात गैर काय आहे? माझी मागणी योग्य असेल तर चौकशी व्हावी. तसेच, मी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं की बाळासाहेबांच्या पायांचे ठसे घेऊन ठेवा, ते आमचं दैवत आहेत. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, मी त्यांच्या हाताचे ठसे घेतले आहेत, असा दावा त्यांनी पुन्हा केला.
March by the United Tribal Community : आरक्षणाच्या रक्षणासाठी आदिवासींचा एल्गार!
या सर्व घडामोडींमुळे शिवसेना शिंदे गटावर ताण निर्माण झाला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे गट या वक्तव्यावरून शिंदेसेनेवर हल्लाबोल करत आहे, तर दुसरीकडे शिंदे गटातील नेते या वादापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. रामदास कदम यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेलं हे राजकीय वादळ लवकर शमणार नाही, असं चित्र सध्या दिसत आहे.
________