MLA Suggests Extension of Cotton Procurement Period by CCI : आमदार सावरकर यांच्या सूचना, शेतकऱ्यांची सोय आधी बघा
Akola कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी भारतीय कापूस निगम (CCI) कडून कापूस खरेदी नोंदणीसाठी ठरवलेली ३० सप्टेंबर २०२५ ही मुदत तसेच खरेदीचा कालावधी वाढविण्याची सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे.
अकोल्यात आमदार सावरकर यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ आणि भारतीय कापूस निगमचे उपमहाप्रबंधक यांच्या संयुक्त बैठकीत ही सूचना करण्यात आली. सन २०२५-२६ या हंगामात उत्पादित कापूस खरेदीसाठी सीसीआयने “कपास किसान” नावाचे अॅप विकसित केले आहे. या माध्यमातून खरेदी प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार आहे. मानवी हस्तक्षेप टाळून प्रणाली अधिक कार्यक्षम करण्याचा उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Shivsainiks arrested : गनिमी काव्याने आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना अटक
तथापि, या वर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि लांबलेल्या पावसाळ्यामुळे कापूस हंगाम उशिरा सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नोंदणीसाठी अधिक वेळ मिळावा, यासाठी नोंदणीची अंतिम तारीख ३० सप्टेंबर आणि खरेदी कालावधी दोन्ही वाढवावेत, अशी मागणी आमदार सावरकर यांनी बैठकीत केली.
बैठकीदरम्यान सीसीआयच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना “कपास किसान” अॅपचा वापर कसा करायचा याचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. या अॅपच्या वापराबाबत शेतकऱ्यांना सखोल माहिती देण्यासाठी जिल्हा पातळीवर कार्यशाळा आयोजित करण्याची सूचना आमदार सावरकर यांनी दिली.
खरेदीसाठी शेतकऱ्यांकडे आधारकार्ड आणि त्याला जोडलेले बँक खाते असणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांना स्वतःच्या पसंतीचे खरेदी केंद्र निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, कापूस विक्रीवेळी संबंधित शेतकरी प्रत्यक्ष उपस्थित असावा ही अट शिथिल करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे निर्देश आमदार सावरकर यांनी दिले.
अॅपवर नोंदणी करताना ओटीपी प्रणाली आणि थेट बँक व्यवहार असल्याने प्रत्यक्ष उपस्थितीची अट अव्यवहार्य ठरते, अशी बाब आमदार सावरकर यांनी मांडली. त्यांनी सांगितले की, ही अट रद्द करण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल.
अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात १५ ऑक्टोबरपासून कापूस खरेदी सुरू करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. यावेळी जिल्ह्यात अधिकाधिक खरेदी केंद्र सुरू करण्याच्या सूचनाही आमदार रणधीर सावरकर यांनी दिल्या.
Relief to Maratha : मराठ्यांना दिलासा आरक्षणाबाबतच्या जीआरला स्थगितीस नकार !
बैठकीस भारतीय कापूस निगमचे उपमहाप्रबंधक बृजेश कासान, अधिकारी प्रवीण साधू, तिवारी, तसेच शेतकरी शिष्टमंडळाचे राजेश बेले, अनिल गावंडे, डॉ. अमित कावरे, शंकरराव वाकोडे, अंबादास उमाळे, प्रवीण हगवणे, चंदू खडसे, राजेश ठाकरे, विवेक भरणे, भरत काळमेघ, संतोष डोंगरे, लव्ह भटकर, गजानन राऊत, दशरथ फोकमारे, गजानन बेले, रामदास बेले, बाळूभाऊ बहाकर आणि निलेश फोकमारे आदी उपस्थित होते.








