Rane Vs Chavan : अती होतंय… आम्ही सहन करतोय ते राणे साहेबांसाठीच, बाकी कुणासाठी नाही !

MLA Nilesh Rane harshly criticizes BJP state president Ravindra Chavan : शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंची भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाणांवर सडकून टीका

Mumbai: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात महायुतीतील वाढत्या तणावावरून शिंदेसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. सिंधुदुर्गात भाजपाने युती नाकारल्याने राणे यांचा संताप उफाळून आला असून त्यांनी थेट रवींद्र चव्हाण यांच्यावरच निशाणा साधला आहे. मालवणमध्ये बोलताना राणे यांनी भाजपाच्या भूमिकेवर आक्रमक प्रतिक्रिया देत पक्षातील एका व्यक्तीमुळे संपूर्ण युतीवर धोका निर्माण होत असल्याचा दावा केला.

निलेश राणे म्हणाले की रत्नागिरीमध्ये भाजपाने वीसपेक्षा कमी जागा लढवूनही तिथे युती केली, पण सिंधुदुर्गात आम्ही ५०-५० टक्के जागांचा प्रस्ताव दिला तरीही भाजपाने युती केली नाही. सिंधुदुर्गात तीन आमदार असून त्यापैकी दोन आमदार शिंदेसेनेचे आणि एक भाजपाचा आहे. त्यामुळे आम्ही आमचा अधिकार मागतोय, यात चुकीचे काय आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Maharashtra politics : ‘भाजपा मित्रपक्षांना गिळंकृत करतो, आता वेळ शिंदेच्या शिवसेनेची’

भाजपात असताना चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून संपूर्ण राज्यात काम केले, पण रवींद्र चव्हाण मात्र तीन दिवस सिंधुदुर्गातच बसतात आणि बाकी जिल्ह्यांकडे दुर्लक्ष करतात, अशी टीका त्यांनी केली. राज्यात २७५ नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका लागल्या असून फक्त नऊ दिवस उरले आहेत, तरीही ते सिंधुदुर्गातच थांबून काही वेगळेच खेळ करत आहेत. ते नक्की काय करत आहेत हे निवडणुकीच्या अखेरीस पत्रकार परिषद घेऊन उघड करणार असल्याचा इशाराही राणे यांनी दिला.

आपला रोष अधिक स्पष्ट करताना निलेश राणे म्हणाले की, आता अती होत आहे. आम्ही जे काही सहन करतोय ते राणे साहेबांसाठी करतोय, अन्य कुणासाठी नाही. एकनाथ शिंदेंनी महायुतीचा धर्म पाळण्याची भूमिका घेतली असताना काहीजण मुद्दाम राग काढत आहेत. महायुतीत देवेंद्र फडणवीस प्रेमाने सांभाळून घेतात, त्यांच्या बाबतीत दोन मत नाही; तसेच इतर कोणत्याही भाजप नेत्याबद्दल आम्हाला आक्षेप नाही.

Local body election : मिनी मंत्रालयाच्या निवडणुका पुढे ढकलणार?

परंतु एकाच व्यक्तीमुळे ही युती धोक्यात येत असेल तर ते गंभीर आहे. सिंधुदुर्ग हा राणे कुटुंबाला मानणारा जिल्हा आहे. राणेंच्या प्रवेशानंतर भाजपाची ताकद येथे वाढली हे विसरून चालणार नाही. आमचे कार्यकर्ते भाजपातही आहेत आणि शिंदेसेनेतही. आमच्या बाजूने कोणताही वाद नाही; अडचण एकाच व्यक्तीची आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

Gauri Palve : पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू

दरम्यान, निलेश राणे यांनी एकनाथ शिंदेंबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली. “मी दहा वर्षे राजकारणाबाहेर होतो, दोन निवडणुका हरलो. लोकांना वाटू लागले होते की आता मी काही करू शकणार नाही. अशा वेळी एकनाथ शिंदेंनी माझ्यावर मोठा उपकार केला. तिकीट दिले, निवडून आणले. त्यामुळे उरलेले आयुष्य मी शिंदे साहेबांसाठीच जगणार आहे. शिवसेना हा आमचा डीएनए आहे, तीच आमची मूळ ओळख आहे,” असे राणे म्हणाले.

रवींद्र चव्हाणांवर केलेल्या या आक्रमक टीकेमुळे सिंधुदुर्गातील महायुतीचे राजकारण आणखी तापले असून आगामी निवडणूक टप्प्यात युतीचे समीकरण कोणत्या दिशेने जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

_____