Nitesh guarantees victory for BJP and Nilesh for ShivSena : नितेश यांची भाजपचा तर निलेश यांची शिवसेनेच्या विजयाची हमी
Mumbai : तळकोकणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत आणि यावेळी सर्वाधिक लक्ष वेधून घेतोय राणे विरुद्ध राणे हा भावांचा थेट राजकीय संघर्ष. भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे आणि शिंदे गटाचे आमदार निलेश राणे हे दोघेही आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आपल्या पक्षाची सत्ता येणार असल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गात दोन्ही भावांमधील संघर्ष रंगणार हे निश्चित झालं आहे.
या वेळी भाजप आणि शिंदे शिवसेना युतीने नव्हे, तर स्वबळावर लढणार आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांची चुरस केवळ राजकीय न राहता, ती कौटुंबिक संघर्षात रूपांतरित झाली आहे. नारायण राणेंच्या राजकीय वारशावर दोघेही भाऊ स्वतंत्र दावे करत असल्याने सिंधुदुर्गात नव्या सत्तेची समीकरणं तयार होऊ लागली आहेत.
Jain boarding case : अखेर जैन बोर्डिंग व्यवहार रद्द, रवींद्र धंगेकरांच्या लढ्याला यश
शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद 100 टक्के शिवसेना काढणार म्हणजे काढणारच! 27 वर्षांपासून वडील नारायण राणे यांनी जिल्हा परिषद टिकवली आणि दर्जा मिळवून दिला. आता तीच परंपरा आम्ही पुढे नेऊ. नारायण राणेंनी मला आशीर्वाद दिला आहे ‘जा, तू शिवसेना वाढव.’ त्यामुळे आता मैदानात उतरलो आहोत.”
निलेश राणेंनी पुढे सांगितलं, “मी आजवर जिल्हा परिषदेची पायरी चढलो नाही, पण जनतेची कामं केली. आता शिवसेना 100 टक्के जिंकेल. मंत्रालयात मी कुडाळ-मालवण मतदारसंघाचं चित्र बदलून टाकलं. आज तिन्ही राणे सभागृहात आहेत वडील खासदार, आम्ही दोघे भाऊ आमदार असं चित्र महाराष्ट्रात कुठेच नाही.”
दुसरीकडे, भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनीही ठाम भूमिका मांडली. त्यांनी स्पष्ट केलं की, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आता स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे.”
नितेश राणेंनी शिवसेना-भाजप युतीच्या चर्चांवर पडदा टाकत सांगितलं, “शिवसेना-भाजप युती करून बंडखोरीला का प्रोत्साहन द्यायचं? आम्ही स्वबळावर लढू. सिंधुदुर्गात दोन्ही पक्षांची ताकद तुल्यबळ आहे. भाजपकडे 50 उमेदवार तयार आहेत, शिवसेनेकडेही तितकेच. महाविकास आघाडीला उमेदवारच नाहीत. निवडणुका स्वतंत्रपणे लढवू आणि निकालानंतर एकत्र सत्ता स्थापू हीच खरी रणनीती आहे.”
दोघेही भाऊ एकाच जिल्ह्यात, एकाच मतदारसंघाच्या राजकारणातून आलेले असले तरी आता ते दोन वेगवेगळ्या पक्षांचे सेनानी बनले आहेत. नारायण राणेंच्या आशीर्वादाने दोघेही आपापला पक्ष मजबूत करण्याच्या तयारीत आहेत.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कोण जिंकणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे, मात्र एक गोष्ट नक्की या निवडणुकीत सिंधुदुर्गात राणे विरुद्ध राणे हा संघर्ष राज्यभर चर्चेचा विषय ठरणार आहे.








