narayan-rane-statement-sanjay-raut-defamation-case-mazgaon-court-hearing : माझगाव न्यायालयात साक्ष नोंद, सुनावणीत आरोप-प्रत्यारोप
Mumbai: भांडुप येथील कोकण महोत्सवात जानेवारी २०२३ मध्ये केलेल्या वक्तव्यावरून माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील वाद पुन्हा चर्चेत आला आहे. राणे यांच्या भाषणामुळे आपली वैयक्तिक व राजकीय मानहानी झाल्याचा दावा करत संजय राऊत यांनी न्यायालयात दावा दाखल केला असून या प्रकरणी माझगाव न्यायालयात त्यांनी आपली साक्ष नोंदवली आहे.
माझगाव न्यायालयात झालेल्या सुनावणीत संजय राऊत यांनी राणे यांच्या वक्तव्यांवर तीव्र आक्षेप घेतला. “एकेकाळी मी शिवसेना चालवत होतो, हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. माझ्यासारख्या नेता आणि राज्यसभा खासदाराची बदनामी केल्याने लोकांचा राज्यघटनेवरील विश्वास ढळू शकतो, म्हणूनच मी हा खटला दाखल केला,” असे राऊत यांनी साक्षीदरम्यान स्पष्ट केले. त्यांनी आपल्या उमेदवारीसंदर्भातील मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी दिलेले मूळ प्रमाणपत्र न्यायालयात सादर केले. तसेच राणे यांच्या भाषणासंदर्भात प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या प्रतीही पुराव्यादाखल दाखल करण्यात आल्या. २० फेब्रुवारी रोजी त्यांची अधिकृत साक्ष नोंदवण्यात आली.
Bhiwandi mayor election : भाजपला मोठा धक्का; नारायण चौधरींनी बंडखोरी करत मिळवलं महापौरपद
नेमके प्रकरण असे की, जानेवारी २०२३ मध्ये भांडुप येथील अटल बिहारी वाजपेयी मैदानावर आयोजित कोकण फेस्टिव्हल कार्यक्रमात नारायण राणे यांनी भाषण करताना संजय राऊत यांच्या राज्यसभा निवडीबाबत वक्तव्य केले होते. “मी संजय राऊत यांना खासदार केले. बाळासाहेब ठाकरे यांनी मला त्यांना राज्यसभेवर पाठवण्यास सांगितले होते. त्यानुसार मी प्रयत्न केले,” असे राणे यांनी म्हटले होते. तसेच राऊत यांचे नाव मतदार यादीत नव्हते, काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतला होता, मात्र आपण मध्यस्थी करून त्यांना निवडून आणले, असा दावा राणे यांनी केला होता. एवढेच नव्हे तर त्यांना खासदार करण्यासाठी आपण आर्थिक खर्च केला, असेही विधान त्यांनी केले होते.
Nitin Gadkari : टोल नाक्यांवर आता ‘नो कॅश’; १ एप्रिलपासून संपूर्ण व्यवहार डिजिटल
या आरोपांना उत्तर देताना संजय राऊत यांनी न्यायालयात म्हटले की, त्यांच्या उमेदवारीवर प्रश्न उपस्थित करणे ही केवळ वैयक्तिक बदनामी नसून निवडणूक प्रक्रियेवर आणि यंत्रणेवर संशय निर्माण करण्यासारखे आहे. “राज्यसभा निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असते. मी पैसे खर्च करून खासदार झालो, असे म्हणणे म्हणजे भारतीय राज्यघटनेलाच आव्हान देणे आहे,” असा आरोप त्यांनी केला.
या प्रकरणी न्यायालयात पुढील सुनावणी होणार असून न्यायालय काय निर्णय देते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. जानेवारी २०२३ मधील हे वक्तव्य आता न्यायालयीन प्रक्रियेमुळे चर्चेत आले असून दोन्ही नेत्यांतील राजकीय संघर्षाला न्यायालयीन रंग चढल्याचे चित्र आहे.








