Former MoS of Congress is the chief guest at RSS program : आज कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयचा समारोप; २०१८ मध्ये प्रणव मुखर्जी होते प्रमुख पाहुणे
Nagpur संपूर्ण देशातील राजकारणाचे लक्ष वेधून घेणाऱ्या घटनांमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कायम चर्चेत असतो. २०१८ मध्ये कार्यकर्ता विकास वर्गाच्या समारोप सोहळ्यात माजी राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी काँग्रेसच कशाला भाजप आणि संघ स्वयंसेवकांच्याही भूवया उंचावल्या होत्या. आता संघाने काँग्रेसच्या माजी केंद्रीय राज्यमंत्र्यांना या सोहळ्यात आमंत्रित केले आहे. स्व. प्रणव मुखर्जी यांच्यानंतर संघस्थानी येणारे ते कॉंग्रेसशी संबंधित दुसरे मोठे नेते ठरणार आहे. आज, गुरुवार दि. ५ जूनला होणाऱ्या या कार्यक्रमाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय पातळीवरील कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयचा गुरुवारी रेशीमबाग मैदानावर समारोप होणार आहे. या २५ दिवसीय वर्गाच्या समारोपप्रसंगी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत हे स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील. तर माजी केंद्रीय मंत्री अरविंद नेताम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. नेताम हे इंदिरा गांधी यांच्या मंत्रीमंडळात केंद्रीय राज्यमंत्री तर पी.व्ही.नरसिंहराव यांच्या कार्यकाळात कृषी राज्यमंत्री मंत्री होते. २०२३ मध्ये त्यांनी कॉंग्रेसला रामराम करत छत्तीसगडमध्ये हमार राज नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला होता.
PM Awas Yojana : मुख्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यात पंतप्रधनांच्या योजनेत घोटाळा
२०१८ साली प्रणव मुखर्जी या कार्यक्रमाला आले होते व त्यावरून काँग्रेसमधून त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले होते. यंदाच्या कार्यक्रमासाठी संघाकडून नेताम यांना निमंत्रण देण्यात आले व त्यांनी त्याचा स्वीकार केला. नेताम हे काँग्रेसच्या मुशीतून घडलेले नेते आहे. छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बस्तर भागातील ते लोकप्रिय नेते आहेत. आदिवासी नेते अशी ओळख असलेल्या नेताम यांनी २०२३ मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली व हमरा राज नावाचा पक्ष स्थापन केला होता.
दरम्यान ऑपरेशन सिंदूर व जातीआधारित जनगणनेची घोषणा या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरसंघचालक काय भाष्य करणार याकडे सामाजिक व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नागपुरात २२ मे रोजी कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयचे उद्घाटन झाले होते. यात देशातील विविध भागातील ८४० स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.