sanjay-raut-criticism-eknath-shinde-parbhani-mayor-syed-iqbal-political-row : परभणी महापौर निवडीवरून राजकारण तापले!
Mumbai : परभणी महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. परभणी येथे शिवसेना ठाकरे गटाचे सय्यद इक्बाल महापौर झाल्यानंतर शिंदे यांनी ‘मुस्लिम महापौर’ या मुद्द्यावरून ठाकरे गटावर निशाणा साधला होता. त्याला प्रत्युत्तर देताना राऊत यांनी “तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा निष्ठावान मुसलमान परवडला” असा घणाघात केला.
परभणी महापौर निवडणुकीत सय्यद इक्बाल यांना ३९ मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार तिरुमला खिल्लारे यांनाही ३९ मते मिळाली. समसमान मतांनंतर प्रक्रियेनुसार सय्यद इक्बाल यांची महापौरपदी निवड झाली. काँग्रेसचे गणेश देशमुख उपमहापौर झाले. या निकालानंतर शिंदे यांनी ठाकरे गटावर टीका करत परभणीत त्यांचा ‘खरा चेहरा’ समोर आल्याचे वक्तव्य केले होते.
Maharashtra politics : विधान परिषदेतील राज्यपाल कोट्यातील ५ रिक्त जागा लवकरच भरणार
यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, परभणीत भारतीय जनता पक्षाचेही अनेक मुस्लिम नगरसेवक आहेत. मग केवळ मुसलमान असल्यामुळे एखाद्या व्यक्तीवर आक्षेप का घ्यायचा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात मराठी भाषिक मुसलमान कार्यकर्ते वर्षानुवर्षे विविध पक्षांत काम करत आहेत. ते घुसखोर नसून स्थानिक समाजघटकांचा भाग आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राऊत यांनी शिंदेंवर वैयक्तिक टीकाही केली. “ज्या ताटात खाल्ले त्याच ताटात तंगडी वर करणाऱ्यांपेक्षा निष्ठावान शिवसैनिक परवडतो,” असे म्हणत त्यांनी शिंदे गटाला ‘गद्दार’ असे संबोधले. परभणीचे नवे महापौर हे अनेक वर्षे पक्षासाठी काम करणारे कार्यकर्ते असल्याचे सांगत, त्यांच्या निवडीवर आक्षेप घेणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.
देशातील विविध घटनात्मक पदांवर मुस्लीम व्यक्तींनी काम केले आहे, याची आठवण करून देत राऊत यांनी माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचाही उल्लेख केला. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये तसेच राज्यपालपदावरही मुस्लिम व्यक्तींनी काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हिंदू-मुस्लिम असा भेद निर्माण करून राजकारण करण्यापलीकडे सत्ताधाऱ्यांकडे दुसरा कार्यक्रम नसल्याचा आरोप त्यांनी केला.
Transfer policy : सहा वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकाऱ्यांच्या एप्रिलमध्ये सक्तीच्या बदल्या
दरम्यान, परभणी महापौर निवडीच्या निमित्ताने शिवसेनेतील दोन्ही गटांमधील वाद पुन्हा उफाळून आला असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात या मुद्द्याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








