Ravi Rana : मुख्यमंत्र्यांचे निर्देश अन् विकासाच्या १२ मुद्द्यांना गती!

CM’s instructions give momentum to 12 development points : आमदाराच्या पत्राची घेतली दखल; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेत उच्चस्तरीय बैठक

Amravati आमदार रवी राणा यांनी विधानसभेत तसेच लेखी पत्राद्वारे मांडलेल्या अमरावती जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित १२ महत्त्वाच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार निधी मंजुरी व प्रत्यक्ष कार्यवाहीला गती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली.

या बैठकीत अमरावती शहर व जिल्ह्यातील विविध प्रलंबित तसेच प्रस्तावित विकासकामांना तातडीने मंजुरी देणे, आवश्यक निधी उपलब्ध करून देणे आणि संबंधित विभागांना ‘ॲक्शन मोड’मध्ये आणण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले.

Vidarbha Farmers : शेतकऱ्यांच्या हिताचे तीन कृषी कायदे पुन्हा लागू करण्याची मागणी

बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भव्य स्मारक उभारण्यासाठी खासगी जागा खरेदीसाठी १५ कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच हनुमानगडी पर्यटनस्थळाचा सर्वांगीण विकास, १० एकर जागेत बोधीभूमी आध्यात्मिक व सांस्कृतिक संकुल उभारणी, अमरावती महानगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आले.

अचलपूर येथील फिनले मिल सुरू करून कामगारांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्यावर भर देण्यात आला. चिखलदरा पर्यटनस्थळावरील स्कायवॉकची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून ते नागरिकांसाठी खुले करण्याचे निर्देश देण्यात आले. नांदगाव पेठ टेक्स्टाइल पार्क प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी, पुनर्वसनाशी संबंधित प्रश्न मार्गी लावणे, अमरावती शहरातील राजकमल चौकातील उड्डाणपुलाचे काम त्वरित सुरू करणे, तसेच पेढी प्रकल्पातील सर्व प्रलंबित कामे पूर्ण करून नागरिकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.

Bomb Threat : अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी

याशिवाय अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामांना गती देणे, प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे, तसेच पी.आर. कार्डचे वितरण तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले.

ही सर्व विकासकामे पूर्ण होईपर्यंत शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल. आवश्यक त्या ठिकाणी पत्रव्यवहार करून संबंधित विभागांवर दबाव ठेवण्यात येईल, अशी माहिती आमदार रवी राणा यांचे सचिव उमेश ढोणे यांनी दिली.

या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. आशिष येरेकर, अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.