MLA clarifies that the Mayor will be from the BJP : महापौर भाजपचाच होणार असल्याचे आमदार रवी राणांनी केले स्पष्ट
Amravati आगामी महानगरपालिका निवडणुकीत अमरावतीमध्ये एक वेगळे राजकीय समीकरण पाहायला मिळणार आहे. भाजप आणि युवा स्वाभिमान पक्ष (वायएसपी) यांच्यात ‘मैत्रीपूर्ण लढत’ होणार असून, निवडणुकीनंतर भाजपचाच महापौर बसवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना दिलेला शब्द पाळणार असल्याचे सांगत त्यांनी महापालिकेच्या सत्तेसाठी नवी खेळी खेळली आहे.
निवडणुकीच्या रिंगणात भाजप ‘मोठा भाऊ’, तर युवा स्वाभिमान ‘लहान भाऊ’ म्हणून उतरणार असल्याचे राणा यांनी सांगितले. दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढत असले तरी, ज्या प्रभागात भाजपचा उमेदवार कमकुवत असेल तिथे युवा स्वाभिमानचा ‘मजबूत’ उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जातील आणि जिथे युवा स्वाभिमान मागे असेल तिथे भाजपला बळ दिले जाईल. विरोधकांना रोखण्यासाठी ही रणनीती आखण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Municipal elections : भाजप – एमआयएम युतीचा राजकीय स्फोट, ‘पार्टी विथ डिफरंस’चा दावा ?
यावेळी आमदार राणा यांनी भाजपच्या स्थानिक कोअर कमिटीवर निशाणा साधला. “भाजपने तिकीट वाटप करताना केलेल्या गोंधळामुळे अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे,” असा आरोप त्यांनी केला. यामुळेच भाजपच्या काही नाराज पण सक्षम कार्यकर्त्यांना युवा स्वाभिमान पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली असून, ते आता ‘मजबूत’ पर्याय म्हणून समोर आले असल्याचे त्यांनी सांगितले.
Food & Drugs department : रेशनच्या ‘निकृष्ट’ धान्यावरून रणकंदन; युवा सेनेचा आठ तास ठिय्या
युवा स्वाभिमान पक्षाचे ३२ उमेदवार मैदानात असून, भाजपसोबतच्या या अंतर्गत समजुतीमुळे विरोधकांचे आव्हान मोडीत निघेल, असा विश्वास राणा यांनी व्यक्त केला आहे. “दोस्ती भी पक्की, जीत भी पक्की” असे म्हणत आमदार राणा यांनी भाजप-युवा स्वाभिमान युती हीच अमरावती महापालिकेत किंगमेकर ठरेल, असे संकेत दिले आहेत. या विचित्र पण राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या ठरणाऱ्या मैत्रीपूर्ण लढतीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.








