ravindra-chavan-warning-bjp-mlas-absence-legislature-report-card-maharashtra : विरोधकांना कमी लेखू नका; गैरहजेरीवर नियंत्रणासाठी रिपोर्ट कार्ड प्रणाली
Mumbai: विधीमंडळातील कामकाजादरम्यान भाजपच्या काही आमदार आणि मंत्र्यांच्या गैरहजेरीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने कडक भूमिका घेतली असून भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आमदारांना स्पष्ट इशारा दिला आहे. विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका आणि सभागृहातील कामकाज गांभीर्याने घ्या, असे सांगत त्यांनी दांडी मारणाऱ्या आमदारांचे कान टोचले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच वारंवार गैरहजर राहणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांच्या हातात त्यांच्या उपस्थितीचे रिपोर्ट कार्ड देण्यात आल्याचेही समजते.
विधीमंडळात उपस्थिती कमी असल्याबाबत पक्ष नेतृत्व नाराज असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे पक्षाने शिस्तीचे नियम अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे विधीमंडळाच्या कामकाजादरम्यान आमदार किंवा मंत्री अनुपस्थित राहणार असतील, तर त्यांना पक्षाकडे लेखी कारण सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोणतेही योग्य कारण न देता अनुपस्थित राहणाऱ्यांवर पक्षस्तरावर तसेच संसदीय कामकाज विभागाकडून कारवाई होऊ शकते, अशी सूचना देण्यात आली आहे.
Water crisis : उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच दुसरबीडमध्ये पाणीटंचाई; संतप्त महिलांची ग्रामपंचायतीत धडक
भाजपच्या नव्या नियमानुसार सभागृहाचे कामकाज सकाळी सुरू झाल्यापासून सायंकाळी संपेपर्यंत सर्व आमदार आणि मंत्र्यांनी सभागृहात उपस्थित राहणे आवश्यक असेल. सभागृहातील सहभाग वाढवण्यासाठी आणि उपस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाच आमदारांचा एक गट तयार करण्यात आला आहे. या गटातील एका आमदाराकडे त्या गटाची जबाबदारी सोपवण्यात आली असून संबंधित आमदार सभागृहातील उपस्थिती आणि सहभाग याबाबतचा अहवाल तयार करून तो थेट प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे सादर करणार आहे.
मंत्र्यांच्या उपस्थितीवर देखील विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. मंत्र्यांच्या कामकाजावर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांचे थेट निरीक्षण असणार आहे. जर कोणत्या मंत्र्याला किंवा आमदाराला सभागृहातून बाहेर जावे लागले, किंवा अन्य बैठक अथवा महत्त्वाचे काम असेल, तर त्याबाबत पक्षाला आधीच लेखी माहिती देणे आवश्यक राहणार आहे.
पक्षाने घेतलेल्या या निर्णयामुळे विधीमंडळातील शिस्त अधिक कडक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विरोधकांना संधी मिळू नये आणि सभागृहातील चर्चांमध्ये सत्ताधारी पक्षाची प्रभावी उपस्थिती राहावी, यासाठीच हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
Eknath Khadse, Girish Mahajan : बुलढाण्याच्या सिंचनाचा मुद्दा; खडसेंचा सवाल, महाजनांचे उत्तर!
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आमदारांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, विरोधकांना कमी लेखणे योग्य नाही. लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी सभागृहातील कामकाजात सक्रिय सहभाग घेणे ही त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे यापुढे विधीमंडळातील उपस्थिती आणि सहभाग याकडे गांभीर्याने पाहिले जाईल, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे.








