Cancel : Hyderabad Gazette, issue white paper on Kunbi certificates : हैदराबाद गॅझेट रद्द करा, कुणबी प्रमाणपत्रांवर श्वेतपत्रिका काढा
Mumbai : मराठा आरक्षणासंदर्भात काढण्यात आलेल्या हैदराबाद गॅझेटवरील शासन निर्णयावरून ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीत छगन भुजबळ, पंकजा मुंडे, विजय वडेट्टीवार, मंगेश ससाणे आणि प्रकाश शेंडगे यांनी शासनावर जोरदार टीका केली. या नेत्यांनी एकमुखाने मागणी केली की, मराठा समाजासाठी काढलेला जीआर तात्काळ रद्द करावा आणि आतापर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांवर श्वेतपत्रिका काढावी.
बैठकीत छगन भुजबळ हे सर्वाधिक आक्रमक दिसले. त्यांनी थेट प्रश्न केला की, “विधी आणि न्याय विभागाची परवानगी न घेता हैदराबाद गॅझेटच्या संदर्भात तुम्ही शासन निर्णय कसा काढला?” तसेच ओबीसींसाठी असलेल्या ‘महाज्योती’ संस्थेसाठी सरकारी निधी कधी उपलब्ध करून दिला जाणार, असा सवालही त्यांनी केला.
Kadam Vs Parab : मी नार्को टेस्टसाठी तयार आहे, पण आता कोर्टातच उत्तर देईन
भुजबळ म्हणाले, “अनेक ठिकाणी नोंदींमध्ये फेरफार करून कुणबी प्रमाणपत्रं काढली जात आहेत. अशा प्रकारे ओबीसींच्या हक्कांवर घाला घातला जात आहे.”
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही सरकारकडे ठाम मागणी केली की, “मराठा समाजाला दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांवर श्वेतपत्रिका काढा.” तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं, “हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करा. हा जीआर ओबीसी समाजासाठी घातक आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.”
Local body election : दिवाळीनंतर आचारसंहिता; शेवटी महानगरपालिका !
या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार,, पंकजा मुंडे, विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. बैठकीनंतर ओबीसी नेत्यांनी स्पष्ट केले की, “सरकारने या विषयावर तात्काळ भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला जाईल.”








