Giving an open challenge while supporting Bhujbal’s stance ; भुजबळांच्या भूमिकेला पाठिंबा देत दिले खुले आव्हान
Nagpur : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय काढल्यानंतर मराठा समाज आनंद व्यक्त करत असतानाच ओबीसी समाजामध्ये प्रचंड नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शरद पवार यांचे विश्वासू अनिल देशमुख यांनी थेट विरोधाची भूमिका जाहीर केली आहे. त्यांनी छगन भुजबळ यांचा पाठिंबा घेत राज्य सरकारला खुले आव्हान दिलं आहे.
अनिल देशमुख यांनी समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय काढल्याने मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसी आरक्षण देण्याचा मार्ग खुला होतोय. या निर्णयाला छगन भुजबळ साहेबांनी विरोध केला आहे आणि तो विरोध योग्यच आहे. आरक्षणासंदर्भात भुजबळांचा अभ्यास आहे. ते अनेक वर्ष ओबीसींच्या हक्कासाठी लढले आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका न्याय्य आहे.”
Maratha Reservation : ओबीसी आरक्षणावर गदा घालणारा शासन निर्णय रद्द करा!
देशमुख पुढे म्हणाले की, “मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आमचा विरोध नाही. मात्र, ओबीसी समाजाला आधीच 27 टक्के आरक्षण आहे. त्यात 13 टक्के भटके विमुक्त व इतरांसाठी राखीव असून उरलेल्या 19 टक्क्यांमध्ये जर मराठा समाजाला आरक्षण दिलं तर थेट ओबीसींचं नुकसान होणार आहे. त्यांच्या आरक्षणावर गदा येणार आहे.”
शासन निर्णयात आधी ‘पात्र’ व्यक्तींना कुणबी दाखले देण्यात येतील असा उल्लेख होता. मात्र मनोज जरांगे यांच्या आक्षेपानंतर तो शब्द वगळण्यात आला. यावर टीका करत देशमुख म्हणाले की, “हा बदल झाल्याने मराठा समाजाला कुणबी दाखले मिळवणं अधिक सोपं होणार आहे. इतिहासातील काही कागदपत्रांवरून नव्या समाजाला ओबीसी आरक्षण देणं हा अन्याय आहे. त्यामुळे सरकारचा हा निर्णय चुकीचा असून आमचा ठाम विरोध आहे.”
अनिल देशमुख यांच्या या भूमिकेमुळे मराठा-ओबीसी वादाला आणखी धार मिळाली आहे. छगन भुजबळांच्या पाठीशी उभं राहून त्यांनी या संघर्षाला राजकीय उंची दिल्याने पुढील काळात राज्यातील वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.