Rohit pawar : रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांशी भेट; विमान अपघातप्रकरणी कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

rohit-pawar-meets-cm-devendra-fadnavis-ajit-pawar-plane-crash-fir-demand : देवेंद्र फडणवीसांनी दिले तांत्रिक पडताळणीचे आश्वासन

Mumbai : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळात भेट घेत विमान अपघातप्रकरणी महत्त्वाची चर्चा केली. दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी तसेच संबंधित विमान कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली.

या प्रकरणी रोहित पवार यांनी यापूर्वी बारामती पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. नवीन कायद्यानुसार झिरो एफआयआर दाखल व्हावा, अशी त्यांची भूमिका होती. मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यातही त्यांनी प्रयत्न केले; मात्र तांत्रिक कारणांमुळे गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ज्या ठिकाणी घटना घडली त्या बारामतीत गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली. सीआयडीमार्फत चौकशी व्हावी, यासाठीही त्यांनी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले.

Sudhir Mungantiwar : वनसंपदेपासून ज्ञानसंपदेपर्यंत… मुनगंटीवारांचा सभागृहात अफलातून युक्तिवाद

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत रोहित पवार यांनी विविध संशोधन कागदपत्रे आणि अहवालांची प्रत सादर केल्याचे सांगितले. महाराष्ट्रासह देशभरातील नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या शंका त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. केंद्र सरकारकडून सविस्तर अहवाल येण्याची अपेक्षा व्यक्त करत थातूरमातूर निष्कर्ष नकोत, तर तपशीलवार आणि तथ्याधारित अहवाल हवा असल्याची मागणी त्यांनी केली. सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन आणखी काही बाबी उघड करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून गुन्हा नोंदवण्यातील तांत्रिक अडचणी काय आहेत, याची माहिती घेण्याचे आश्वासन दिल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. तसेच काही अतिरिक्त कागदपत्रांची मागणी मुख्यमंत्र्यांनी केल्याचेही त्यांनी नमूद केले. ती कागदपत्रे घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशीही चर्चा होऊ शकते, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.

https://sattavedh.com/prakash-abitkarmaggots-found-in-aiims-canteen-food-health-minister-review-meet

दरम्यान, रोहित पवार यांनी राज ठाकरे यांचीही भेट घेतली. अजित पवार यांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूबाबत पुराव्यांसह सविस्तर माहिती देत या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी पाठिंबा देण्याची विनंती त्यांनी केली. या भेटीत अमित ठाकरेही उपस्थित होते. राज्यातील मोठा जनाधार असलेले राज ठाकरे या लढ्यात पूर्ण ताकदीनिशी पाठीशी उभे राहतील, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.

Vijay Wadettiwar : सार्वजनिक उपक्रमासाठी असलेली जागा विकली, निबंधक निलंबित

याशिवाय, दिवंगत अजित पवार यांच्या स्मृती जपण्यासाठी विविध मागण्या मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली. मुंबईतील देवगिरी बंगल्यावर स्मारक उभारावे, विधानभवन परिसरातही स्मारक व्हावे, बारामती विमानतळाला त्यांचे नाव द्यावे तसेच तेथे नाईट लँडिंगची सुविधा आणि अत्याधुनिक विकास करावा, अशी मागणी त्यांनी केली. पुणे रिंग रोडलाही अजित पवार यांचे नाव देण्याची विनंती करण्यात आली आहे.

अपघातात मृत्यू पावलेले सुरक्षा रक्षक सुदीप जाधव यांच्या पत्नी ठाणे महापालिकेत करारावर कार्यरत असून त्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याची मागणीही रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. या सर्व मागण्यांमुळे विमान अपघातप्रकरणी राजकीय वातावरण पुन्हा तापले असून आगामी काही दिवसांत या विषयावर अधिक घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

__