‘No checking day’ at Shirpurbandh checkpoint after action : आरटीओ तपासणीवरून ट्रक थेट रवाना, अधिकारी गायब
Gondia देवरी तालुक्यातील शिरपूरबांध येथील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील आरटीओ तपासणी नाक्यावर शुक्रवारी (दि. 11) झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी (दि. 12) या नाक्यावर वाहनांची तपासणी थांबल्याचा प्रकार समोर आला आहे. नाक्यावर उपस्थित कर्मचारी ट्रक थांबवताना दिसले नाहीत, तर काही कर्मचारीच नजरेआड झाल्याचे चित्र होते.
शुक्रवारी एका ट्रक युनियनच्या तक्रारीवरून नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई करत शिरपूरबांध तपासणी नाक्यावर कार्यरत मोटार वाहन निरीक्षक योगेश खैरनार आणि दोन खासगी व्यक्तींना ट्रक चालकाकडून लाच घेताना रंगेहाथ पकडले. हा प्रकार घडत असताना लाखो रुपयांच्या अवैध वसुलीचा तपशीलही उघड झाला असून, आरटीओ नाक्यावर दररोज मोठ्या प्रमाणात वसुली होत असल्याच्या चर्चेला पुष्टी मिळाली आहे.
कारवाईच्या दुसऱ्याच दिवशी, शनिवारी, या नाक्यावरून जाणाऱ्या शेकडो मालवाहू ट्रकची कागदपत्र तपासणी पूर्णपणे थांबवण्यात आली. ना ट्रक थांबवले गेले, ना कागदपत्र विचारले गेले – जणू काही सर्वकाही शांततेत सुरू असल्याचा आभास निर्माण झाला. अनेकांनी हे ‘नो चेकिंग डे’ असल्याची उपरोधिक टीका केली.
आरटीओ नाक्यावर कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत खासगी व्यक्ती वाहनांची कागदपत्र तपासत असल्याचे अनेक वेळा पाहायला मिळाले. या खासगी व्यक्ती कोणत्या अधिकृत प्रक्रियेतून नियुक्त करण्यात आल्या, त्यांना कागदपत्र तपासण्याचा अधिकार कोण देतो? – हे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.
या नाक्यावर 15 वर्षांपूर्वी अशीच एक लाचखोरी प्रकरणातील कारवाई झाली होती. त्यानंतर पुन्हा यंदा ही कारवाई होत आहे. पण यावेळी कारवाईनंतर संबंधित अधिकारी मौखिक आदेशावरच तैनात असल्याचे उघड झाले आहे. नागपूर ग्रामीण आरटीओ विभागातील असलेले निरीक्षक, कोणत्याही लेखी आदेशाविना देवरीच्या आरटीओ नाक्यावर कसे कार्यरत होते? यामागे कोणाचे आशीर्वाद होते, यावरून आता संशयाचे धुके गडद होत चालले आहे.
Action against defaulters : वणी पालिकेची ४ कोटी ३२ लाखांची वसुली!
या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास, अवैध वसुली साखळीतील अनेक ‘मोठे मासे’ गळाला लागू शकतात, अशी प्रतिक्रिया जाणकार व्यक्त करत आहेत. मौखिक आदेश, खासगी व्यक्तींचा सहभाग, आणि वाहनांची टाळलेली तपासणी हे सर्व घटक विभागातील गूढ जाळे उघड करत आहेत.