Rupali chakankar : भोंदूबाबा प्रकरणाचा फटका; रुपाली चाकणकरांचा राजीनामा

rupali-chakankar-resignation-ncp-third-resignation-mahayuti-government-maharashtra : महायुती सरकारच्या काळात राष्ट्रवादीतील तिसरा मोठा धक्का

Mumbai : महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर दीड वर्षाच्या आतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सलग तिसरा मोठा राजीनामा द्यावा लागल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. या घडामोडीनंतर त्यांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरूनही पायउतार व्हावे लागणार असल्याची माहिती समोर येत आहे.

अशोक खरात याच्यावर शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप असून त्याच्या अटकेनंतर या प्रकरणाने मोठे स्वरूप धारण केले आहे. याच दरम्यान रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. एका व्हिडीओमध्ये चाकणकर या खरातची पाद्यपूजा करताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला, तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये त्यांनी त्याची तुलना विठ्ठलाशी केल्याचे बोलले जात आहे. या सर्व गोष्टींमुळे चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठली आणि त्यांच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले.

Nagpur municipal corporation : चालते व्हा…भाजपचा पाणी पुरवठा करणाऱ्या ओसीडब्ल्यू कंपनीला अल्टिमेटम

या वादाच्या पार्श्वभूमीवर राजकीय दबाव वाढत गेला आणि अखेर चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा असल्याने हे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याला राजकीय दृष्ट्या मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

महायुती सरकारच्या काळात राष्ट्रवादीतील हा तिसरा मोठा राजीनामा ठरला आहे. याआधी बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी दबाव वाढल्याने धनंजय मुंडे यांनी ४ मार्च २०२५ रोजी अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नाशिक सत्र न्यायालयाने सदनिका घोटाळा प्रकरणात शिक्षा कायम ठेवल्याने माणिकराव कोकाटे यांनी १८ डिसेंबर २०२५ रोजी मंत्रिपदाचा राजीनामा देत नैतिक जबाबदारी स्वीकारली होती.

Zilla Parishad Election : राजवाडा सजला, ‘राजा’ची प्रतीक्षा! निवडणुकीचं काही ठरेना

आता रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा धक्का बसला आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना महिला प्रदेशाध्यक्षपदही सोडण्याचे निर्देश दिल्याची चर्चा असून, त्यामुळे त्यांचे राजकीय स्थान आणखी कमजोर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सलग घडामोडींमुळे महायुती सरकारच्या काळातील राष्ट्रवादीची अंतर्गत परिस्थिती आणि नेतृत्वावरील दबाव याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.