rupali-chakankar-resigns-ncp-women-state-president-ashok-kharat-case : अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय धक्का
Mumbai : राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणाऱ्या अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावर असलेल्या रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विरोधकांसह पक्षातील काही गटांकडून सातत्याने वाढत असलेल्या दबावानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे. यापूर्वी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला होता, त्यामुळे हा निर्णय त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.
अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांचे नाव चर्चेत आले होते. खरात यांच्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. तसेच खरात यांना गुरु मानत असल्याच्या चर्चेमुळेही त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप केल्याच्या आरोपांमुळे त्यांच्यावर अधिक दबाव निर्माण झाला होता.
राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, अशोक खरात प्रकरणाशी संबंधित कोणत्याही आर्थिक व्यवहारात किंवा गैरकृत्यात त्यांचा दूरान्वयेही संबंध नाही. पोलीस तपासातून सत्य समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने व्हावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे मागणी केल्याचेही स्पष्ट केले.
दरम्यान, अशोक खरात यांच्यावर शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात संबंधित प्रत्येक व्यक्तीची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. खरात यांच्या शिवनिका ट्रस्टशी संबंधित संचालकांचीही चौकशी होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
Mahayuti government : अतिक्रमण करून घर बांधले? चिंता करू नका… सरकारचा महत्त्वाचा निर्णय
रुपाली चाकणकर या शिवनिका ट्रस्टच्या संचालकांपैकी एक असल्याचे समोर आल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सर्व घडामोडींमुळे पुढील काळात त्यांच्यावर चौकशीची टांगती तलवार राहणार असून, राज्याच्या राजकारणात या प्रकरणाचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.








