Possibility of connecting Buldhana, Chikhali areas with Samruddhi Highway : थेट महामार्गावर प्रवेशाचे मार्ग खुले होणार; MSRDC ने पर्याय तपासले
Buldhana बुलढाणा आणि चिखली परिसरातून समृद्धी महामार्गावर प्रवेश करण्यासाठी सध्या मेहकरमार्गे सुमारे १० ते १२ किलोमीटरचा फेरा मारावा लागतो. यामुळे प्रवासाचा वेळ वाढतो तसेच मेहकर शहरातील वाहतुकीवर ताण येतो. लोकप्रतिनिधींनी ही बाब सरकारच्या लक्षात आणून दिली होती. त्याची दखल घेण्यात आली आहे.
अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धिरज लिंगाडे यांनी राज्य सरकारकडे नवीन थेट पोहोच मार्गाची मागणी केली होती. त्यानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ MSRDC ने दोन पर्यायांची सकारात्मक पडताळणी सुरू केली आहे. त्यामुळे आता बुलढाणा, चिखली भागाला थेट समृद्धी महामार्गाशी जोडण्याचा मार्ग खुला होणार आहे.
बुलढाणा व चिखली येथील नागरिक सध्या चिखली–मेहकर राष्ट्रीय महामार्ग (NH-544CC) मार्गे हिवरा आश्रम, नागझरी, कल्याण फाटा, मेहकर असा मार्ग वापरून समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंज (IC-11) पर्यंत पोहोचतात. या मार्गावर अंदाजे १० किलोमीटरचा फेरा पडतो व सुमारे ३० ते ४० मिनिटांचा वेळ अधिक लागतो.
Public Safety Act 2024 : गुरुजींना मान्य नाही जन सुरक्षा विधेयक!
ही अडचण दूर करण्यासाठी आमदार लिंगाडे यांनी कल्याण फाटा येथून समृद्धी महामार्गावर थेट प्रवेश व निर्गमनाचा पर्याय सुचवला होता. यासाठी एमएसआरडीसीने खालील दोन पर्यायांचा अभ्यास सुरू केला आहे.
पहिला पर्याय
नागझरी गावठाण ते कल्याण गाव, पुढे गौंधाळा गावाजवळ खामगाव–मेहकर राष्ट्रीय महामार्गापर्यंत रस्ता जोडणे आणि तेथून १.८ किमी अंतरावर असलेल्या समृद्धी इंटरचेंजपर्यंत पोहोचणे. या मार्गासाठी कल्याण गावातील अरुंद रस्ता टाळण्यासाठी १.२० किमी लांबीचा नवीन वळण रस्ता तयार करावा लागेल. या प्रकल्पासाठी ८१.९० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
दुसरा पर्याय
कल्याण गावातून सरळ गौंधाळा गावाजवळ राष्ट्रीय महामार्गाशी जोडणी करणे आणि तेथून समृद्धी इंटरचेंजपर्यंत पोहोचणे. यामध्येही अरुंद रस्त्याचा प्रश्न आणि भूसंपादन गरजेचे आहे. या कामासाठी ५३.१० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
Akola Ram Navami Celebration : रामनवमीच्या शोभायात्रेत राजकीय शक्तिप्रदर्शन!
या नव्या मार्गांमुळे मेहकर शहराची वाहतूक टाळता येणार असून, अंदाजे १० किलोमीटरचा फेरा व ३० ते ४० मिनिटांचा अतिरिक्त वेळ वाचू शकतो. बुलढाणा व चिखलीमधून समृद्धी महामार्गावर सहज व वेगवान प्रवेश शक्य होणार आहे.
एमएसआरडीसीने स्पष्ट केले आहे की, हे मार्ग सध्या ग्रामीण व जिल्हा मार्गाच्या श्रेणीत येतात. त्यामुळे त्यांची गुणवत्तापूर्ण सुधारणा करूनच पुढील प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे. या संदर्भात सादर करण्यात आलेला अहवाल सध्या नोडल अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलेला आहे.








