Beneficiaries’ outcry against the Tehsil Office : संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनांच्या लाभार्थ्यांचा तहसील कार्यालयावर आक्रोश
Amravati संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि इतर मासिक मानधन योजनांचे ७ ते ८ महिन्यांपासून थकीत मानधन न मिळाल्याने शेकडो वृद्ध व लाभार्थ्यांनी सोमवारी चांदूररेल्वे तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात आप, शिवसेना (ठाकरे गट), भाकप, माकप आणि जनता दल यांसारख्या विरोधी पक्षांनी सक्रिय सहभाग नोंदवत राज्य सरकारविरोधात जोरदार हल्लाबोल केला.
गेल्या आठ दिवसांपूर्वी तहसीलदार पूजा माटोडे यांना निवेदन देऊन लाभार्थ्यांनी आपली मागणी मांडली होती. तथापि, अद्यापही मानधन जमा न झाल्याने संतप्त लाभार्थ्यांनी पुन्हा रस्त्यावर उतरावे लागले. “हक्काचे मानधन न दिल्याने वृद्धांची उपासमार होत आहे. शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा,” अशी मागणी आंदोलकांनी केली. अप्पल धर्मशाळेजवळून मिरवणुकीला सुरुवात झाली. आंदोलकांनी टाळ-ढोल, बॅनर आणि घोषणांसह तहसील कार्यालय गाठले. या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत प्रशासनाला इशारा देण्यात आला की, १ ऑक्टोबरपर्यंत थकीत मानधन जमा न झाल्यास गांधी जयंतीदिनी तीव्र आंदोलन छेडले जाईल.
Local Body Election : आरक्षण अधिसूचना जाहीर; अनेकांचे गणित बिघडण्याची शक्यता
या आंदोलनात आम आदमी पक्षाचे नेते व माजी तहसील उपाध्यक्ष नितीन गवळी, बहू यादव, गजानन व्यंकटेश, सतीश डोटे, अॅड. प्रभाकर भगत, मेहमूद हुसैन, कॉ. रामदास कारमोरे, तसेच विविध पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले. याशिवाय मोठ्या संख्येने महिला आणि वृद्ध लाभार्थी उपस्थित होते.
आंदोलनानंतर तहसील कार्यालयात स्वतंत्र मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. लाभार्थ्यांचे आधारकार्ड सीडिंग, बँक लिंकिंग यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ७-८ महिन्यांचे थकीत मानधन लवकरच जमा करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव पाठविण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार पूजा माटोडे यांनी दिली.








