lonar-tourism-paragliding-launch-administrative-hurdles : जागतिक वारसा स्थळाच्या विकासावरून माजी आमदारांचे प्रशासनावर ताशेरे
Mehkar जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ असलेल्या लोणार सरोवराच्या विकासाचा रथ गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकीय फाईल्स आणि न्यायालयीन पेचात अडकलेला आहे. एकीकडे ‘अ’ दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून मिरवणाऱ्या लोणारमध्ये मूलभूत सुविधांसाठीही झगडावे लागत असतानाच, आता स्थानिक युवकांनी स्वबळावर पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘पॅराग्लायडिंग’सारखे धाडसी पाऊल उचलले आहे. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर या सुविधेचा प्रारंभ झाला असला, तरी या निमित्ताने लोणारच्या रखडलेल्या विकासावरून पुन्हा एकदा राजकीय खडाजंगी सुरू झाली आहे.
माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते ‘गीतम स्पोर्ट्स पॅरामोटरिंग अॅडव्हेंचर क्लब’चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी लोणारच्या विकासात आड येणाऱ्या प्रशासकीय भिंतींकडे लक्ष वेधले. चिखलदऱ्याच्या धर्तीवर लोणारचा कायापालट होऊ शकतो, मात्र पर्यटन, वन, पुरातत्त्व आणि महसूल या चार विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळे लोणारचा विकास ‘जैसे थे’ असल्याचा सूर यावेळी उमटला.
कार्यक्रमात स्थानिक नेतृत्वाने लोणारच्या सद्यस्थितीवर मांडलेले मुद्दे महत्त्वाचे ठरत आहेत. जागतिक वारसा असूनही, अनेक विभागांच्या जाचक अटींमुळे पर्यटनपूरक प्रकल्पांना गती मिळत नसल्याची टीका यावेळी करण्यात आली. केवळ न्यायालयीन समितीच्या निर्देशानुसार काही कामे सुरू आहेत, परंतु लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांना प्रशासकीय स्तरावर अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.
Speed breakers : शेगावात ‘मागेल त्याला गतिरोधक’चा सुळसुळाट; वाहनधारकांचे कंबरडे मोडले!
पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात शासन अपयशी ठरत असताना, खासगी क्लबच्या माध्यमातून युवकांनी उचललेले पाऊल हे राजकीय व्यवस्थेला एक प्रकारे आरसा दाखवणारे आहे. लोणार सरोवराची नैसर्गिक रचना पाहता येथे पॅराग्लायडिंगसाठी मोठे वाव आहे. या उपक्रमामुळे पर्यटकांचा ओघ वाढण्याची शक्यता असली, तरी सुरक्षेचे निकष आणि वन विभागाच्या परवानग्यांचा अडसर दूर करणे हे मोठे आव्हान असणार आहे.
पॅराग्लायडिंग तज्ज्ञ आशिष तोमर यांनी प्रकल्पाची तांत्रिक बाजू मांडली असली, तरी याला राजकीय आणि प्रशासकीय पाठबळ किती मिळते, यावर या प्रकल्पाचे भविष्य अवलंबून आहे. या कार्यक्रमास नगराध्यक्ष भूषण मापारी, शिवसेना तालुकाप्रमुख भगवानराव सुलताने यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. निवडणुकांच्या तोंडावर लोणारच्या विकासाचे मुद्दे पुन्हा तापू लागले असून, पॅराग्लायडिंगच्या निमित्ताने सुरू झालेली ही चर्चा आता लोणारच्या रखडलेल्या ‘मास्टर प्लॅन’पर्यंत पोहोचली आहे.








