BJP targeted over speculation about santosh dhuri’s party switch : संतोष धुरींच्या पक्षांतराच्या चर्चेवरून भाजपवर निशाणा
Mumbai मनसे नेते संतोष धुरी यांच्या पक्षांतराच्या चर्चेवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी तीव्र टीका केली. “जे मुंबईचे दुश्मन आहेत, जे मुघल वृत्तीचे आहेत, त्यांच्या तंबूत जाऊन बसणं ही दुर्दैवी बाब आहे,” असे ते म्हणाले. भारतीय जनता पार्टीवर हल्लाबोल करताना त्यांनी म्हटले की, “कार्यकर्त्यांना भाजपचं नेमकं काय वेड लागलंय, हे कळत नाही. पण हे लक्षात ठेवा, तुमच्या पुढच्या पिढ्या सुखी राहणार नाहीत.”
शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यामागे कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही. हा केवळ मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाचा विचार आहे. दोन भाऊ, दोन नेते एकत्र येतात, ही मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी आणि सकारात्मक घडामोड आहे, असे राऊत यांनी सांगितले.
संजय राऊत यांनी जाहीर केले की, ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि ते स्वतः मिळून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त मुलाखत घेणार आहेत. मांजरेकर हे मोठे कलाकार असले तरी ते प्रथम मुंबईकर आहेत आणि मुंबईच्या प्रश्नांवर त्यांची ठाम भूमिका आहे, असेही राऊत यांनी नमूद केले.
निवडणूक प्रचाराबाबत बोलताना राऊत यांनी सांगितले की, ९ जानेवारीला राज ठाकरे यांची पहिली सभा नाशिकमध्ये होणार आहे, तर उद्धव ठाकरे संभाजीनगरमध्ये सभा घेणार आहेत. “आम्हाला सभा कधी घ्यायच्या, कशा घ्यायच्या, हे शिकवण्याची गरज नाही,” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. मुंबईतील काही मैदाने आधीच आरक्षित असतानाही शिवसेना आणि मनसेला सभा घेता येऊ नयेत यासाठी सरकारची ‘राक्षसी वृत्ती’ काम करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
Akola Municipal Corporation Election : यंदा प्रथमच सहा ठिकाणी मनपा निवडणुकीची मतमोजणी
उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीबद्दल राऊत म्हणाले की, सभा घेण्यापेक्षा थेट कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणे ही त्यांची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. मुंबईत एकच मोठी विराट सभा घ्यावी यावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. पक्षांतर्गत बंडखोरीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, बंडखोरांना समजावून सांगण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यांच्या मनातील गैरसमज दूर झाले की, राग शांत होईल आणि बंडखोरही शांत होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.








