Sanjay Raut publicly praised him, even tweeting, We should have spoken : संजय राऊतांकडून जाहीर कौतुक, ‘हमे बोलना चाहिए था’ म्हणत ट्वीटही केले
Mumbai : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे जाहीरपणे कौतुक केले आहे. मुनगंटीवार हे भाजपाचे ‘शंभर नंबरी सोनं’ असून ते पक्षाचे मूळ, ओरिजनल नेते असल्याचे स्पष्ट शब्दांत संजय राऊत यांनी म्हटले आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत भाजपातील जुन्या कार्यकर्त्यांची होणारी घुसमट आणि वेदना मुनगंटीवारांच्या वक्तव्यांतून व्यक्त होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
संजय राऊत म्हणाले की, सुधीर मुनगंटीवार यांच्या भावना या सच्च्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. ते भाजपाचे ज्येष्ठ नेते असून ज्यांना आम्ही ओरिजनल म्हणतो, असे शंभर नंबरी सोनं आहेत. पक्षाचा मूळ ढाचा, साचा आणि विचार काय आहे, हे त्यांना चांगले माहीत आहे. ते संघाचे स्वयंसेवक असल्यामुळे त्यांची वेदना स्वाभाविक आहे. बाहेरून आलेल्या लोकांनी पक्षाचा ताबा घेतला आहे आणि तेच आज पक्ष चालवत आहेत, ही वेदना प्रत्येक सच्च्या कार्यकर्त्याच्या मनात असते, असेही राऊत यांनी सांगितले.
ज्यांनी पक्षासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, संघर्ष केला, लाठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला, अशा कार्यकर्त्यांपैकी सुधीर मुनगंटीवार हे एक आहेत, असे संजय राऊत यांनी ठामपणे सांगितले. ते मूळ भाजपचे लोक आहेत आणि म्हणूनच त्यांच्या बोलण्यात पक्षाविषयीची कळकळ आणि अस्वस्थता दिसून येते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या संदर्भात संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक ट्विटही केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी कवी हिमांशू मोहन यांची कविता शेअर केली आहे. ‘एक दिन हम सब अपनी अपनी चुप्पियो को लेकर मर जायेंगे, और हमारा सबसे आखरी खयाल होगा, हमें बोलना चाहिए था’ अशा आशयाची ही कविता असून, त्यावर ‘ हमे बोलना चाहिए था’ असे शब्द राऊत यांनी लिहिले आहेत. या ट्विटमधून त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपातील अंतर्गत अस्वस्थता आणि जुन्या कार्यकर्त्यांच्या दडपल्या गेलेल्या भावना अधोरेखित केल्याचे बोलले जात आहे.
Sudhir Mungantiwar : पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २० हजार बोनस द्या
संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, विरोधी पक्षातील नेते असूनही त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांचे केलेले कौतुक लक्षवेधी मानले जात आहे. भाजपातील जुने आणि नवे नेतृत्व, तसेच संघाशी नाळ असलेल्या नेत्यांची भूमिका यावरून येत्या काळात राजकारणात आणखी चर्चांना उधाण येण्याची शक्यता व्यक्त केली.
__








