Sanjay Raut said discussions were held with Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली, आम्ही हवेत बोलत नाही
Mumbai : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी उद्धव ठाकरे यांना साद घातली. त्याला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला. त्यानंतर आता हे दोघे भाऊ एकत्र येणार, अशा चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाल्या आहेत. पण राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडीचं काय? उबाठा महाविकास आघाडी सोडणार का, हा प्रश्न उपस्थित होतो.
मुंबईत आज (१९ एप्रिल) पत्रकारांनी हाच प्रश्न उबाठाचे नेते खासदार संजय राऊत यांना विचारला. त्यावर महाविकास आघाडी म्हणजे, तेव्हा आम्ही आमच्यासाठी ती राजकीय व्यवस्था केली होती. त्याचं नंतर बघता येईल, असे म्हणत त्यांनी या प्रश्नाला बगल दिली. ते पुढे म्हणाले, भाजपवाले राज ठाकरेंचा वापर करून घेत आहेत. पडद्यामागून मराठी माणसाला त्रास देत आहेत. हे राज ठाकरे यांच्या लक्षात आलं पाहिजे.
सोबत येण्यास उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत का, या प्रश्नावर माझी यासंदर्भात उद्धव ठाकरेंशी काल (१८ एप्रिल) सकाळी आणि रात्रीही चर्चा झाली. आम्ही हवेत बोलत नाही. मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाचे व्यवहार आणि व्यवसायावर कुणी घाव घालत असेल तर आम्ही शांत बसू शकत नाही. राज ठाकरेंकडून चांगली भूमिका समोर आली असेल तर ती नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही. शेवटी ते दोघे भाऊ आहेत आणि आम्ही सगळे मित्र आहोत. वंदनीय बाळासाहेबांनी जो प्रवास सुरू केला होता, त्यातील आम्ही सर्वजण यात्री आहोत, असे संजय राऊत म्हणाले.