Thackeray group and Congress criticize Ravindra Dhangekar’s entry into Shinde Sena : काँग्रेस म्हणते, आम्हाला काहीही फरक पडत नाही
Nagpur रविंद्र धंगेकर हे संघर्षातून तयार झालेले नेतृत्व आहे. त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी सत्तेच्या वळचणीला गेल्यानंतर त्यांचे नेतृत्व संपत असते. त्यामुळे खरा रविंद्र धंगेकर आता संपला आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. तर काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदेसेनेत सत्तेचे गवत खाणारे खूप झाले, त्यात आता धंगेकरांची भर पडली, अशी टीका केली आहे.
काँग्रेसेचे पुण्याचे नेते रविंद्र धंगेकर यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश करीत असल्याचे जाहीर केले आहे. पुण्यातील कसबा पेठ या विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीत विजयी झाल्यानंतर धंगेकर चर्चेत आले होते. गेल्या २० वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ त्यांनी खेचून आणला होता. यानंतर त्यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून पुणे लोकसभा निवडणूक सुद्धा लढविली होती. परंतु त्यांना यात पराभव पत्करावा लागला.
Vijay Wadettiwar : वाढत्या गुन्हेगारीवरून वडेट्टीवार, जयंत पाटील सरकारवर तुटून पडले!
यानंतर अचानकपणे त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार संजय राऊत यांनी धंगेकर यांना शुभेच्छा असल्याचे म्हटले आहे. धंगेकर यांनी नेहमीच विरोधी पक्षात राहून राजकारण केले आहे. त्यांचा राजकीय नेता म्हणून उदय विरोधी पक्षात झाला आहे. त्यांना आता जर सत्तेच्या वळचणीला जाऊन बसावे वाटत असेल तर त्यांच्यातील रविंद्र धंगेकर हा आता संपला आहे. त्यांच्यामागे असलेले कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहणार नाही, असेही खासदार राऊत म्हणाले.
काँग्रेसला फरक पडत नाही – वडेट्टीवार
हिरवळ दिसत असल्याने अनेकजण सत्तेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करीत असतात. धंगेकर त्यांच्यापैकीच एक आहेत. या बातमीने आम्हाला धक्का बसलेला नाही, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. त्यांना पक्षाने सर्व काही दिले आहे. अत्यंत कमी काळात त्यांना आमदारकी व लोकसभेची उमेदवारी दिली. शिवसेनेत सत्तेचे गवत खाणारे खूप झाल्याने हे गवत संपणार आहे. याची प्रचिती त्यांना लवकरच येईल. त्यावेळी त्यांना खरी परिस्थिती कळेल, असा टोला त्यांनी लगावला.
ही तर सुरूवात आहे – म्हस्के
धंगेकरांचे शिंदेसेनेत येणे ही तर केवळ सुरूवात आहे. यापुढे पुन्हा अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे.