Santosh Dhuri : “आता इकडे राहण्यात काय अर्थ…”,

What is Sandeep Deshpande’s answer to Santosh Dhuri question : संतोष धुरींच्या प्रश्नावर संदीप देशपांडेंचं उत्तर काय?

Mumbai : मनसेकडून तिकीट न मिळाल्याने नाराज असलेले वरळीतील माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. या राजकीय हालचालीनंतर मनसेतील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा उघड झाली असून, धुरी यांनी मनसे नेतृत्वावर आणि युती प्रक्रियेवर गंभीर आरोप केले आहेत.

संतोष धुरी यांच्या भाजप प्रवेशानंतर मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे हेही भाजपमध्ये जाणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांवर भाष्य करताना धुरी यांनी संदीप देशपांडे यांची भूमिका स्पष्ट केली. “मनसेच्या स्थापनेपासून आम्ही राज ठाकरे यांच्यासोबत होतो. पण ज्यांच्यामुळे पक्ष फुटला, त्यांनाच पुन्हा जवळ केलं गेलं,” असा आरोप धुरी यांनी केला.

Santosh Dhuri : उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना दिलं काय?

युतीच्या चर्चेदरम्यान संदीप देशपांडे यांना कोणत्याही बैठकीत सहभागी करून घेण्यात आलं नाही, असा दावाही त्यांनी केला. “संतोष धुरी आणि संदीप देशपांडे कुठेही दिसले नाही पाहिजेत, असा संदेश वांद्रेच्या बंगल्यावरून देण्यात आला,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. ही बाब समजल्यानंतर आपण संदीप देशपांडे यांच्याशी संवाद साधला, असं धुरी म्हणाले.

“मी संदीप देशपांडेंना विचारलं, आता इकडे राहण्यात काय अर्थ आहे? त्यावेळी त्यांनी शांतपणे ‘तू तुझा विचार कर, मी काही येत नाही,’ असं सांगितलं,” अशी माहिती धुरी यांनी दिली. संदीप देशपांडे यांचं मन मोठं असून त्यांनी वैयक्तिक पातळीवर कोणताही निर्णय घाईने घेतला नाही, असं म्हणत धुरी यांनी त्यांचं कौतुकही केलं.

Collector of Jalgao Jamod : मुख्याधिकाऱ्यांच्या पक्षपाती भूमिकेविरोधात नगरसेवकांचा तीव्र निषेध

मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला सुमारे ५२ जागा सोडल्याचं चित्र आहे. मात्र, त्यापैकी फक्त सात ते आठ जागांवर विजय मिळेल की नाही, याचीही खात्री नाही, असा आरोप संतोष धुरी यांनी केला. “उद्धव ठाकरे गटाने आम्हाला हव्या त्या जागा दिल्या नाहीत. उलट ज्या ठिकाणी त्यांच्याकडे उमेदवार नव्हते किंवा विद्यमान नगरसेवकांची प्रतिमा खराब झाली होती, अशाच जागा मनसेला देण्यात आल्या,” असं ते म्हणाले.

माहीम, दादर, वरळी, शिवडी आणि भांडूपसारख्या मराठी मतदारसंख्या जास्त असलेल्या भागांमध्ये मनसेची केवळ एका जागेवर बोळवण करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. “ठाकरे गटाला ज्या जागा सोडायच्या होत्या, त्याच जागा मनसेच्या गळ्यात टाकल्या,” असं धुरी यांनी स्पष्ट केलं.

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टवर सापडले ड्रग्ज?

संतोष धुरी हे मनसेचे माजी नगरसेवक असून, संदीप देशपांडे आणि धुरी यांची दीर्घकाळची घनिष्ठ मैत्री आहे. मनसेच्या जवळपास प्रत्येक आंदोलनात धुरी सक्रिय होते. मागील महापालिका निवडणुकीत त्यांनी मनसेकडून निवडणूक लढवली होती, मात्र त्यावेळी त्यांना पराभव पत्करावा लागला होता. यंदा ठाकरे बंधूंच्या युतीच्या पार्श्वभूमीवर धुरी हे प्रभाग क्रमांक १९४ मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. संदीप देशपांडे यांनीही त्यांच्या तिकीटासाठी प्रयत्न केले होते. मात्र, जागावाटपात हा प्रभाग उद्धव ठाकरे गटाकडे गेल्याने ही नाराजी टोकाला गेली आणि अखेर संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

या घडामोडींमुळे मनसेतील अस्वस्थता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे अधिकच तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

__