Why Sayaji Shinde angry with government over felling trees in Tapovan : तपोवनमधील वृक्षतोडीवर सयाजी शिंदे सरकारवर एवढे का संतापले?
Nashik : नाशिकमध्ये येऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला असताना तपोवन परिसरातील नियोजित वृक्षतोडीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. विकास कामांसाठी झाडांची तोड होणार असल्याची चर्चा पुढे आल्यानंतर नाशिकमधील पर्यावरणप्रेमी मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करत आहेत. या वृक्षतोडीला तीव्र विरोध होऊ लागल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि पर्यावरणसंवर्धनासाठी ओळखले जाणारे सयाजी शिंदे यांनीही सरकारवर अधिक कठोर शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
सयाजी शिंदे हे केवळ लोकप्रिय अभिनेते नाहीत तर वृक्षसंवर्धनासाठी चाललेल्या चळवळीतील एक महत्त्वाचा आवाज आहेत. सह्याद्री देवराई या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी राज्यभरात वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन आणि जैवविविधतेच्या रक्षणासाठी मोठी मोहीम राबवली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक भागात देवराई निर्माण झाल्या असून हजारो झाडांचे संरक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यावरणाशी निगडित विषयांवर त्यांचे मत विशेष महत्त्वाचे मानले जाते.
नाशिकमधील तपोवन परिसरात कुंभमेळ्याच्या कामांसाठी होणार असलेल्या वृक्षतोडीची माहिती समोर आल्यानंतर स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि विविध सामाजिक संघटना मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या आहेत. “विकास हवा, पण झाडांच्या किमतीवर नाही” अशी भूमिका घेणाऱ्या या आंदोलनाला आता राज्यभरातून पाठिंबा मिळू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर सयाजी शिंदे यांनी व्यक्त केलेल्या भावनिक आणि तीव्र भूमिकेने संपूर्ण प्रकरणाला नवे वळण दिले आहे.
नाशिकमधून फोन येत असल्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले, “एक झाड तोडलं तर आम्ही शंभर जण मरायला तयार आहोत… झाड तोडून दाखवा,” असा थेट इशारा नागरिकांकडून दिला जात असल्याचे मला सांगण्यात येत आहे. मी प्रत्यक्ष तिकडे जाऊ शकत नाही, पण लाखो वनप्रेमी तिथे झटत आहेत. त्या सर्वांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. तपोवनमधील वृक्षतोड ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि सरकारने पर्यावरणाशी खेळ करू नये,” असे ते म्हणाले.
Local body election : ठाण्यात भाजपा – शिवसेना शिंदे गटात भीषण राडा
राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी “एक झाड तोडलं तर दहा झाडं लावू” असे म्हटल्यावर सयाजी शिंदे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत, “तुम्ही चेष्टा करत आहात का? आतापर्यंत कोणत्या हायवेच्या कडेला दहा झाडं लावले आहेत? लावली असतील तर दाखवा,” असा थेट सवाल केला. विकासाच्या नावाखाली वारंवार झाडांची कत्तल होत असताना सरकारने दाखवलेल्या झाडे लावण्याच्या आश्वासनांवर त्यांनी पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“समाज पेटून उठेल… मी निमित्त मात्र असेल. लोकांमध्ये झाडांविषयीची भावना वाढली आहे. एक झाड हेसुद्धा जीव आहे, त्याचं संरक्षण करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे,” असे म्हणत त्यांनी सरकार आणि प्रशासनाला इशारा दिला आहे.
Local body election : भाजप नेत्यांचे नातेवाईक बिनविरोध; पुन्हा घराणेशाहीच्या चर्चा !
तपोवनमधील वृक्षतोडीला दिलेला हा तीव्र विरोध, शिंदे यांच्या भाष्यामुळे आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. पर्यावरणप्रेमी आंदोलक आणि स्थानिक नागरिक झाडांचे रक्षण करण्यासाठी सज्ज आहेत. सरकारची पुढील भूमिका काय असेल, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. कुंभमेळ्याच्या तयारीच्या नावाखाली झाडांची कत्तल होणार का, की पर्यावरणसंवर्धनाला प्राधान्य देत पर्यायी मार्ग काढला जाणार, याबाबत निर्णय होणे महत्त्वाचे ठरणार आहे.
_______








