Sbl energy company blast : नागपूर एसबीएल एनर्जी कंपनी स्फोट प्रकरणी मोठी कारवाई

nagpur-sbl-energy-company-blast-culpable-homicide-case-against-21-officials-9-arrested : संचालकांसह 21 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, 9 जणांना अटक

Nagpur: नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे 1 मार्च 2026 रोजी सकाळच्या सुमारास एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत झालेल्या भीषण स्फोट प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. बारुद तसेच डेटोनेटर आणि इतर स्फोटके तयार करणाऱ्या या कंपनीत झालेल्या स्फोटात आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. उपचारादरम्यान आणखी एका जखमीचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कंपनीच्या 21 वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 105 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

कळमेश्वर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यात कंपनीचे मालक संजय चौधरी, इतर संचालक, प्लांट हेड, प्रोजेक्ट मॅनेजर, प्लांट मॅनेजर, सुपरवायझर आणि सेफ्टी ऑफिसर यांचा समावेश आहे. प्राथमिक तपासात सुरक्षाविषयक नियमांचे पालन करण्यात गंभीर त्रुटी आढळल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आतापर्यंत 9 जणांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

Jai pawar : “विमान हवेत अन् पायलटच्या सीटवर मालक झोपला”

स्फोटानंतर आग लागल्यामुळे बचावकार्यात मोठे अडथळे निर्माण झाले होते. अग्निशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी नागपूरचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये मदत जाहीर केली आहे, तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.

Iran israel war : इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमतीत उसळी

या भीषण स्फोटामुळे औद्योगिक सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. तपास यंत्रणा सध्या स्फोटाचे नेमके कारण, सुरक्षा उपाययोजनांतील त्रुटी आणि जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टीने सखोल चौकशी करत आहेत. आगामी काळात या प्रकरणात आणखी अटक किंवा कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.