seat struggle : शिवसेना–भाजपमध्ये तणाव; अधिक जागांसाठी शिंदे आग्रही

Plan to contest all seats on my own if talks fail : चर्चा फसल्यास सर्व जागांवर स्वबळावर लढण्याचा प्लान

Mumbai : राज्यात महापालिका निवडणुकांचे बिगूल वाजल्यानंतर महायुतीतील अंतर्गत हालचालींना वेग आला असून मुंबई महानगरपालिकेच्या जागावाटपावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. आगामी निवडणुकांसाठी भाजपबरोबर जागावाटपाबाबत चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक ठोस ‘प्लान बी’ तयार ठेवल्याची माहिती समोर येत आहे. भाजप अपेक्षेप्रमाणे जागा देण्यास तयार न झाल्यास शिवसेना शिंदे गट मुंबईतील सर्व २२७ जागांवर स्वबळावर लढण्याची रणनीती आखत असल्याचे सांगितले जात आहे.

निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार २३ डिसेंबरपासून महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्ष निवडणूक तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या जागावाटपावरून महायुतीत कुरबुरी वाढताना दिसत आहेत. शिवसेना शिंदे गटाने अधिकृतपणे १२५ जागांची मागणी केल्याची माहिती असून भाजपकडून सुरुवातीला केवळ ५० ते ६० जागांचा प्रस्ताव मांडण्यात आल्याचे बोलले जात आहे. दोन्ही पक्ष महायुती म्हणून निवडणूक लढवण्यास इच्छुक असले तरी चर्चेत अपेक्षित प्रगती न झाल्यास पर्यायी मार्ग अवलंबण्याची तयारी शिंदे गटाने सुरू केली आहे.

Minister Vacancy : माणिकराव कोकाटेंच्या रिक्त मंत्रीपदासाठी राष्ट्रवादीत हालचालींना वेग

याच पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबईतील सर्व २२७ प्रभागांमधील संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती शिवसेना शिंदे गटाकडून घेण्यात आल्या. या मुलाखतींना मोठा प्रतिसाद मिळाला असून तब्बल २,७०० इच्छुक उमेदवार उपस्थित होते, अशी माहिती शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी दिली. युतीचा निर्णय काहीही झाला तरी प्रत्येक प्रभागात सक्षम आणि निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार तयार ठेवणे, हा या प्रक्रियेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राहुल शेवाळे यांनी सांगितले की, शिवसेना महायुतीचा घटक म्हणून मुंबई महापालिका निवडणूक लढवेल, मात्र पक्षाचा भर सर्वोत्तम उमेदवार देण्यावर आहे. ही प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी तीन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. इतर पक्षांच्या तुलनेत शिवसेनेच्या मुलाखतींना मिळालेला प्रतिसाद मोठा असून हा प्रतिसाद म्हणजे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची पावती असल्याचेही त्यांनी नमूद केले. सूत्रांनुसार, मुलाखतींसाठी आलेल्या इच्छुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि काँग्रेसमधील काही नेत्यांचाही समावेश होता.

Winds of defection : भाजप प्रवेशासाठी संजोग वाघेरे मुंबईकडे रवाना

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटासाठी ही पहिलीच मुंबई महानगरपालिका निवडणूक असणार आहे. त्यामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद आणि तळागाळातील पकड सिद्ध करण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपबरोबरचे जागावाटप अखेरीस सुरळीत होईल, असा विश्वास पक्षाला असला तरी कोणत्याही परिस्थितीत गाफील न राहण्याचे स्पष्ट निर्देश शिंदे यांनी नेत्यांना दिले आहेत.

चर्चा फसल्यास शिवसेना सर्व २२७ जागांवर स्वबळावर लढण्यासाठी पूर्णपणे सज्ज असावी, असे आदेश देण्यात आल्याचेही सांगितले जाते.
सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार, ‘उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता’ या निकषावर दोन्ही पक्षांमध्ये आतापर्यंत सुमारे १५० जागांवर एकमत झाले असल्याची माहिती आहे. उर्वरित ७७ जागांवर पुढील चर्चेत निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र या जागांवरूनच अंतिम तणाव निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंची शिक्षा कायम, मात्र अटक टळली

 

मुंबई महानगरपालिकेचा राजकीय इतिहास पाहता ही निवडणूक अधिक महत्त्वाची ठरणार आहे. २००२ आणि २००७ च्या निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युतीने चांगली कामगिरी केली होती. २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने ८४ जागा जिंकत महानगरपालिकेवरील आपले वर्चस्व कायम ठेवले होते. मात्र २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्याने परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील दोन गटांमधील थेट संघर्ष आणि भाजपाची वाढती ताकद यामुळे यावेळची मुंबई महापालिका निवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत निर्णायक ठरणार आहे. याच कारणामुळे जागावाटपावरून निर्माण झालेला तणाव, शिंदेंचा ‘प्लान बी’ आणि महायुतीतील पुढील घडामोडींकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागून राहिले आहे.

__