69 Lakh Hectares Affected Across 34 Districts : जून ते सप्टेंबरदरम्यान खरीप पिकांचे मोठे नुकसान, शासनाकडून २,८९९ कोटींची मदत वितरित
Mumbai जून ते सप्टेंबर या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील खरीप हंगामाला जबर फटका बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार ३४ जिल्ह्यांतील तब्बल ६८ लाख ६९ हजार ७५६ हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. एकूण २२८ तालुके आणि ६५४ हून अधिक महसूल मंडळांतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यात १० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित असलेले २२ जिल्हे आहेत. अकोला (१.४६ लाख हेक्टर), वाशिम (२.४२ लाख), बुलडाणा (३.२२ लाख) आणि यवतमाळ (५.१० लाख हेक्टर) या पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांचा सर्वाधिक फटका बसला आहे.
Local Body Elections : मोर्शी व अचलपूरमध्ये पुन्हा महिलांना संधी, सलग दुसरी वेळ
२२ जुलै ते २३ सप्टेंबरदरम्यान बाधित झालेल्या ३४ जिल्ह्यांसाठी राज्य शासनाने २ हजार ८९९ कोटी १६ लाख रुपये मंजूर केले असून, ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे.
अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग या खरीप पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले. तसेच काही ठिकाणी भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी, हळद यांनाही मोठा फटका बसला आहे.
सर्वाधिक बाधित जिल्ह्यांमध्ये नांदेड, वाशिम, यवतमाळ, बुलडाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, रत्नागिरी, नागपूर, गडचिरोली, नंदुरबार, नाशिक, चंद्रपूर, सातारा, कोल्हापूर, पुणे, सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यांचा समावेश आहे.
नांदेड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ आणि बीड जिल्ह्यांत सर्वाधिक नुकसान नोंदवले गेले आहे. १५ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरदरम्यान सर्वाधिक पाऊस झाल्याचे नोंदींवरून स्पष्ट झाले आहे. जून ते ऑगस्ट या काळातील खरीप पिकांच्या नुकसान भरपाईसाठी २ हजार २१५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. डीबीटी पोर्टलद्वारे ४७ लाख ५२ हजार ५५९ बाधित शेतकऱ्यांना निधी वितरण सुरू आहे.
सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी पंचनामे सुरू असून, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडून प्रस्ताव मिळाल्यानंतर तातडीने निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
Anup Dhotre : भुसावळ–वर्धा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गाला मंत्रिमंडळाची मंजुरी
एनडीआरएफअंतर्गत पंचनाम्यासाठी एका दिवसात किमान १.६५ मिमी पाऊस किंवा सलग पाच दिवस २.१० मिमी प्रतिदिन पाऊस झाल्यास, आणि हा पाऊस संबंधित महसूल मंडळाच्या दीर्घकालीन सरासरीपेक्षा ५० टक्क्यांहून अधिक असल्यास, त्या भागास अतिवृष्टीग्रस्त मानले जाते.








