Shahaji Bapu Patils venomous criticism of Sanjay Raut : शहाजी बापू पाटलांची संजय राऊतांवर जहरी टीका !
Gondia : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमधील आरोप – प्रत्यारोप अधिक तीव्र होताना दिसत आहेत. माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जहरी टीका करत त्यांना भविष्य सांगणारा पोपट अशी उपमा दिली.
गोंदियातील कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर बोलताना शहाजी बापू पाटील म्हणाले, संजय राऊतांनी आत्तापर्यंत अनेक चिठ्ठ्या काढल्या, पण त्या सगळ्या खोट्या ठरल्या. असा पोपट उद्धव ठाकरे यांनी लवकरच पिंजऱ्यात बंद करून टाकायला हवा. कारण भविष्य सांगणाऱ्या या पोपटाच्या भविष्यवाण्या वारंवार फोल ठरत आहेत.
धनखड यांच्यावरील टीकेचा समाचार घेताना शहाजीबापूंनी राऊतांवर हल्ला चढवला. धनखड कुठे आहेत, कुठे लपवले आहेत यावरून तुम्ही टीका करता, पण ते आजारी आहेत. विजय भाजपचाच आहे. तुम्ही कशाला मध्येच लुडबूड करता? जा, पटदिशी शोधा त्यांना. उद्धव ठाकरेंच्या जवळ सुखाने भाजीभाकर खा, एवढंच काम करा, असा खोचक सल्ला त्यांनी राऊतांना दिला.
Local body election : आपलं कोणी शत्रू नाही, पण सगळीकडे युती शक्य नाही !
यावेळी शहाजीबापूंनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरूनही टीका केली. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरी मुंबई, ठाणे, नाशिक यांसारख्या महापालिकांवर महायुतीचाच विजय होणार हे निश्चित आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाचा राजकीय परिणाम काहीच होणार नाही, असा दावा त्यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाबाबत बोलताना शहाजी बापू पाटील म्हणाले, शिंदे हे ठाण्याचे नाही तर संपूर्ण राज्याचे नेते आहेत हे त्यांनी सिद्ध केले आहे. विधानसभेला शिंदेंचा चेहरा होता म्हणूनच महायुतीला बहुमत मिळालं. शिंदे यांना नशिबाने मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, तर दिवस – रात्र कष्ट करून हे पद त्यांनी कमावलं आहे. आनंद दिघे यांनी त्यांना नेता बनवलं आणि बाळासाहेब ठाकरे यांनी आशीर्वाद दिला.
Jigao Project : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याची नदीत उडी, दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह
संजय राऊतांवर टीका करत शहाजी बापू म्हणाले, राऊत हा आमच्या मतावर निवडून आलेला खासदार आहे. सकाळी नऊला नारळाच्या झाडाखाली बोलणारा आणि साडेनऊला घरात जाणारा हा नेता महाराष्ट्राच्या खेडोपाड्यातील वास्तव जाणणार कसा? हा बेडका सारखा फुगून झालेला बैल आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर बोलण्याइतका मोठा नेता संजय राऊत कधीच नाही.शहाजी बापू पाटलांच्या या तिखट विधानांमुळे ठाकरे गट – शिंदे गटातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.








