Claim that Marathwada will benefit greatly : मराठवाड्याला मोठा लाभ होणार असल्याचा दावा
Nagpur: नागपूर ते गोवा या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला काही भागांतून विरोध होत असतानाच राज्य सरकारने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या मार्गामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा महामार्ग सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांतून जाणार असून याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. शक्तिपीठ महामार्ग हा राज्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून या मार्गाचा सर्वाधिक फायदा मराठवाडा विभागाला होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सभागृहात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नागपूर–गोवा द्रुतगती महामार्गाचे नाव जरी नागपूर–गोवा असले तरी हा महामार्ग मराठवाड्याचे चित्र बदलणारा ठरणार आहे. या प्रकल्पासंदर्भात मागील काळात नागरिकांकडून काही आक्षेप मांडण्यात आले होते. विशेषतः सोलापूरपासून प्रस्तावित असलेले संरेखन हे विद्यमान राष्ट्रीय महामार्गाला समांतर जात असल्याने ग्रीनफिल्ड महामार्गाचा मूळ उद्देश साध्य होत नव्हता. ग्रीनफिल्ड महामार्गामुळे नव्या भागांचा विकास होतो, अद्याप न जोडले गेलेले परिसर मुख्य प्रवाहात येतात, ही बाब लक्षात घेऊन सरकारने संरेखन बदलण्याचा निर्णय घेतल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या प्रयत्नांतून एसएनडीटीला १०० कोटीचा निधी
यानंतर जयकुमार गोरे यांच्यासह संबंधित लोकप्रतिनिधींशी चर्चा करून सोलापूरपासून एक वेगळी, नवी अलाइनमेंट तयार करण्यात आली आहे. ही नवी अलाइनमेंट चंदगडपासून सोलापूर आणि सांगलीमार्गे जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी दिली. यामुळे यापूर्वी शक्तिपीठ महामार्गापासून दूर राहिलेले काही मतदारसंघ थेट महामार्गाशी जोडले जाणार आहेत. या मार्गामुळे संबंधित भागांच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, नव्या संरेखनामुळे पंढरपूर परिसरालाही महामार्गाचा थेट लाभ मिळणार आहे. या भागात संयुक्त मोजणी करण्यात आली असून भूसंपादनाची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. काही लोकप्रतिनिधी सुरुवातीला या मार्गाबाबत साशंक होते, मात्र हा महामार्ग त्यांच्या मतदारसंघासाठी किती उपयुक्त ठरेल, हे लवकरच त्यांच्या लक्षात येईल, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.
Municipal elections : महानगरपालिका निवडणुका 2025 संदर्भात आज मोठी घोषणा होण्याची शक्यता
शक्तिपीठ महामार्ग हा धार्मिक पर्यटनाला चालना देणारा आणि राज्यातील संपर्क सुविधा बळकट करणारा महत्त्वाचा प्रकल्प मानला जात आहे. नागपूर ते गोवा हा मार्ग अनेक जिल्ह्यांतून जाणार असल्याने पर्यटन, व्यापारी देवाणघेवाण आणि स्थानिक रोजगार निर्मितीस मोठा फायदा होणार आहे. धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी स्थानिक पातळीवर विरोध दिसून आला होता, मात्र सरकार कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे स्पष्ट करत सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांतून नवे संरेखन नेण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.








