sharad-pawar-dinner-diplomacy-mva-mla-meeting-rajya-sabha-election-maharashtra : मविआ आमदारांसोबत विशेष बैठकीमागे आभार की नवे समीकरण?
Mumbai : राज्यसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांसोबत ‘डिनर डिप्लोमसी’चे आयोजन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. येत्या २३ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे हा विशेष कार्यक्रम पार पडणार आहे.
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सातही जागांवरील निवडणूक बिनविरोध पार पडली असून या निवडणुकीत एक वेगळे चित्र पाहायला मिळाले. शरद पवार महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर निवडून गेले, तर अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार महायुतीकडून निवडून आले. आजोबा आणि नातू एकाच वेळी राज्यसभेवर निवडून आल्याने राजकीय पातळीवर या घटनेची मोठी चर्चा रंगली आहे.
SIR Mapping : एसआयआर मॅपिंगला गती; दिरंगाई करणाऱ्या ३२ बीएलओंना नोटीस
या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मविआच्या आमदारांसाठी आयोजित केलेल्या ‘डिनर डिप्लोमसी’मागील कारणाबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यसभा खासदार म्हणून निवड झाल्यानंतर मविआतील सर्व मित्रपक्ष आणि आमदारांचे आभार मानण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र या निमित्ताने आगामी राजकीय रणनीती, आघाडीतील एकजूट आणि भविष्यातील समीकरणांवरही चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यसभेवर निवड झाल्यानंतर शरद पवार यांनी जनतेचे आणि मित्रपक्षांचे आभार मानताना त्यांच्या दीर्घ राजकीय प्रवासाचा उल्लेख केला होता. १९६७ साली प्रथमच महाराष्ट्र विधानसभेवर निवडून येत सार्वजनिक जीवनाची सुरुवात झाली आणि त्यानंतर मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता तसेच केंद्रात संरक्षणमंत्री आणि कृषीमंत्री म्हणून जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले होते. हा प्रदीर्घ प्रवास जनतेच्या विश्वासामुळेच शक्य झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या ‘डिनर डिप्लोमसी’मध्ये केवळ आभार प्रदर्शन होणार की यामागे काही मोठे राजकीय संदेश दडलेले आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीतील एकजूट अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार असल्याची चर्चा असून या बैठकीनंतर राज्याच्या राजकारणात नवे संकेत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
__








